– मेहकरसह पाच बाजार समित्यांसाठी उद्या मतदान, निकालही उद्याच जाहीर होणार!
– उर्वरित बाजार समित्यांसाठी ३० एप्रिलला मतदान
– खा.जाधव व आ. रायमुलकर ‘प्रताप’गड़ सर करणार का? जिल्ह्याला उत्सुकता!
– चिखलीत आ. श्वेताताई महालेविरुद्ध राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वाची परीक्षा!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – जिल्ह्यातील बाजार समिती निवड़णुकीत शिंदे गट, भाजप व महाविकास आघाड़ीत ‘काटे की टक्कर’ होणार असल्याचे चित्र स्पष्ट असून, उद्या दि. २८ एप्रिलरोजी मतदान होणार्या बाजार समित्यांसाठी ‘आजची रात्र कत्ल’ची ठरणार आहे. तर मेहकर बाजार समितीचा ‘प्रतापगड़’ खासदार प्रतापराव जाधव व आ. ड़ॉ. संजय रायमुलकर हे सर करतात का? याकड़े अवघ्या जिल्ह्याच्या नजरा लागून आहेत. तर चिखली बाजार समितीसाठी आ. श्वेताताई महाले व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्यातच जोरदार लढत पहायला मिळत आहे. दरम्यान, उद्या मतदान होणार्या बाजार समित्यांचे निवड़णूक निकाल उद्याच घोषित करण्यात येणार आहेत. त्यामुळे सहाजिकच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.
जिल्ह्यातील मेहकर, लोणार, खामगाव, देऊळगावराजा, चिखली, बुलढाणा, मलकापूर, नांदुरा, शेगाव व जळगाव जामोद या बाजार समित्यांच्या निवड़णुका सुरू असून, मतदारसंघ मोठा असल्याने व दिवस कमी मिळाल्याने मतदारांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी उमेदवारांची दमछाक होत आहे. उद्या, २८ एप्रिलरोजी मेहकर, बुलढाणा, देऊळगाव राजा, खामगाव व मलकापूर बाजार समितीसाठी मतदान होणार असून, त्यासाठी आजची रात्र कत्ल की राहणार आहे. मेहकर बाजार समिती नेहमीप्रमाणे ताब्यात घेण्यासाठी खा.प्रतापराव जाधव व आ.संजय रायमुलकर यांनी चांगलीच प्रतिष्ठा पणाला लावलेली दिसते. त्यासाठी सर्कलनिहाय मतदार व कार्यकर्ते बोलावून ‘अभी नही तो कभी नही’ या प्रमाणे सक्त आदेश देवून काम करण्याचे फर्मावले आहे. बहुतेक सोसायट्या, ग्रामपंचायतीमध्ये खा.जाधव व आ.रायमुलकर यांचे विचारांचे पदाधिकारी आहेत ही जमेची बाजू असल्याचे नाकारून चालणार नाही. असे असले तरी शिवसेना फुटीचा तड़ाखा त्यांना बसणार असल्याचे कार्यकर्ते बोलत आहेत. मात्र मतदार सिलेक्टेड़ असल्याने ही धग किती पोहोचेल हे निवड़णूक निकालानंतरच समजणार आहे. खा.जाधव यांचे बहुतांश नातेवाईक मतदारापर्यंत पोहोचत असून, पॅनल चालवाअशी गळ घालताना दिसत आहेत. महाविकास आघाडीचे आशीष राहाटे, श्याम उमाळकर, लक्ष्मण घुमरे, माजी जि.प अध्यक्ष भाष्कर ठाकरे, तालुकाध्यक्ष देवानंद पवार, सतिष ताजणे, कासम गवळी, किशोर गारोळे, विलास चनखोरे, रणजीत देशमुख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने भिड़ले आहेत. दरम्यान, काल २६ एप्रिलरोजी माजी मंत्री आ. ड़ॉ. राजेन्द्र शिंगणे यांनी मेहकर येथे बैठक घेऊन अवश्यक सूचना दिल्या. शेतकरी नेते रवीकांत तुपकरही भिड़ून आहेत. येथे भाजपा व्यापारी व अड़ते मतदारसंघ स्वबळावर लढत असून, इतर मतदारसंघात मात्र तटस्थ राहणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केल्याची माहिती आहे. याचा फायदा महाविकास आघाडीला होतो का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. एकंदरीत एरव्ही एकेरी होणार्या या निवड़णुकीत मात्र आता चांगलीच रंगत आली असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, मेहकर बाजार समितीसाठी सोसायटी मतदारसंघासाठी ३, ग्रामपंचायत ३, अ़ाडते व व्यापारी तसेच हमाल मापारी यासाठी प्रत्येकी एक असे एकूण आठ मतदान केंद्र असल्याचे सहाय्यक निवड़णूक अधिकारी गजानन फाटे यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले. येथे निवड़णूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार संजय गरकल हे काम पाहत आहेत. लोणारमध्ये खा.जाधव, आ.रायमुलकरविरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आहे. येथे भाजपाने सर्व उमेदवार मागे घेतले आहेत, याचा फायदा आघाडीला होणार का? याकड़े जाणकारांचे लक्ष आहे. खामगाव बाजार समितीत आ. आकाश फुंड़कर व माजी आ. दिलीपकुमार सानंदा यांच्यात अतितटीची लढत आहे. येथील सोसायटीचे काही मतदार तर चक्क गुलाबी शहराच्या सहलीवर असल्याची खात्रीलायक माहिती आहे. मतदानासाठी खामगाव येथे १२ मतदान केंद्र नियुक्त केले आहेत. येथे निवड़णूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार अतुल पाटोळे काम पाहत आहेत. बुलढाणा बाजार समितीमध्येही आ.संजय गायकवाड व आघाडीच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. येथे मागील काळात जालींधर बुधवत यांनी केलेल्या कामांचा फायदा होवू शकतो. येथे निवड़णूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक हिवाळे काम पाहत आहेत.
देऊळगावराजा बाजार समितीसाठी माजी मंत्री आ. ड़ॉ. राजेन्द्र शिंगणे व माजी आ.शशिकांत खेड़ेकर यांच्यातच सामना आहे. येथे महाविकास आघाडीत काही नवख्यांना उमेदवारी दिल्याचे सांगत झालेली नाराजी कोणाच्या पथ्यावर पड़ते हे काळच सांगेल. येथे निवड़णूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक जगदाळे काम पाहत आहेत. मलकापूर व नांदुरा येथे आ.राजेश एकड़े व माजी आ. चैनसुख संचेती, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मलकापूर येथे निवड़णूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक कृपलानी हे काम पाहत आहेत. बाजार समितीचा बहुसंख्य मतदार ग्रामीण भागातील असल्याने यापूर्वी मतदान केंद्र ग्रामीण भागातच होते. पण यावेळी मतदान केंद्र तालुक्याचे ठिकाणी असल्याने मतदारांना गैरसोयीचे होणार आहे. दरम्यान, शेगाव, जळगाव जामोद येथे सरळ लढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. चिखली बाजार समितीत आ.श्वेताताई महाले व माजी आ. राहुल बोंन्द्रे यांच्यातच सामना आहे. येथे वंचित आघाडीने माघार घेतल्याचा फायदा राहुल बोंद्रे यांना होणार असे वर्तवले जात आहे.
तर महाविकास आघाडीचे नेते भिड़ून काम करत असताना आ.श्वेताताई महालेसुध्दा ताकतीने मैदानात उतरल्या आहेत. त्यांनी स्वतः प्रत्येक मतदारांपर्यंत जात भेटीगाठी घेतल्या आहेत. येथे निवड़णूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार सुरेश कव्हळे हे काम पाहत आहेत. जिल्ह्यात काही ठिकाणी मतदारांची पळवापळवी सुरू असल्याची माहिती आहे. एकंदरीत बाजार समिती निवड़णूक निकालावरून आगामी निवडणुकांचे चित्र काहीसे स्पष्ट होणार असल्याने ही निवड़णूक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. उद्या मतदान होणार्या बाजार समितीसाठीचा प्रचार काल, २६ एप्रिलरोजी संध्याकाळी संपला असून, ३० एप्रिलला मतदान असणार्या बाजार समित्यांच्या निवड़णुकीसाठीच्या प्रचारतोफा उद्या २८ तारखेला संध्याकाळी थंड़ावणार आहेत.
कर्मचार्यांची कमतरता व ३० एप्रिलचेआत बाजार समिती निवड़णुका घेण्याचे कोर्टाचे आदेश, यामुळे निवड़णूक प्रक्रिया सोयीची व सुलभ होण्यासाठी मतदान केंद्र तालुक्याचे ठिकाणी देण्यात आले आहेत. तसा प्रोग्राम संबंधित निवड़णूक निर्णय अधिकार्यांनी दिला होता.
– संगमेश्वर बदनाळे, जिल्हा उपनिबधक तथा जिल्हा निवड़णूक निर्णय अधिकारी, बुलढाणा
——————