बुलढाणा/देऊळगावमाळी (गणेश निकम) – जिल्ह्यासाठी भूषण असणार्या व्यक्ती आगामी काळात राज्यासाठीदेखील भूषणावह ठरतील. हल्ली नाचण्याचा ट्रेंड आलाय, मात्र वाचणारे वाचतात व पुढे जातात. म्हणून नाचण्याऐवजी वाचण्यावर भर द्यावा, असे प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक बाबाराव महामुनी यांनी केले. आयुष्यभर कलेची साधना करणारे कलामहर्षी हरिभाऊ राऊत यांचा गुणगौरव, ग्रंथतुला व जिल्हा भूषण पुरस्कार वितरण सोहळा २५ एप्रिल रोजी देऊळगाव माळी येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते. बुलढाणा अर्बनचे सीईओ डॉ.सुकेश झंवर, उपजिल्हाधिकारी सुनील शेळके, उपजिल्हाधिकारी ललितकुमार वर्हाडे, सुनील सपकाळ या विविध क्षेत्रात भूषण ठरलेल्या व्यक्तींना जिल्हा भूषण पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला.
शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, साहित्यिक सदानंद देशमुख, प्रमोदबापू देशमुख, पत्रकार राजेंद्र काळे, गणेश निकम, रणजीतसिंह राजपूत, उद्योजक किशोर गारोळे, गटविकास अधिकारी गजानन पाटोळे, सरपंच किशोर गाभणे, बाबुराव बळी यांच्यासह शिवजयंती उत्सव समिती बुलढाणाचे अध्यक्ष डॉ. शोन चिंचोले, एडवोकेट जयसिंगराजे देशमुख, प्राध्यापक संतोष आंबेकर, सोहम घाटगे, एडवोकेट सतीशचंद्र रोठे, उत्तमराव बिडवे, कुणाल पैठणकर, अनंत शिरसाट, डॉक्टर राजेंद्र वाघ, संग्राम देशमुख, प्राचार्य संजय जाधव, प्राध्यापक विजय घ्याळ, प्राध्यापक डी एम कापसे, शैलेश खेडकर, विनोद बोरे, कुणाल पैठणकर, दामोदर बिडवे आदींची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे अध्यक्ष से.नि.अभियंता एन.ए.बळी होते. कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार कैलास राऊत यांच्या पुढाकारातून तरुणाई फाउंडेशनद्वारा करण्यात आले. रात्री याच ठिकाणी संदिपपाल महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तरुणाई फाउंडेशनची सर्व पदाधिकारी व पत्रकार कैलास राऊत मित्र परिवाराने परिश्रम घेतले.
मानवतेची कास धरूया – सुनील सपकाळ
जिल्हा भूषण पुरस्कारप्राप्त सुनील सपकाळ यांनी सत्कारला उत्तर देताना समाजकार्य हा आपला श्वास आणि ध्यास असल्याचे सांगून माता पित्या इतकेच समाज ऋणदेखील महत्वाचे असल्याचे सांगितले. समाज ऋण फेडतांना आपण देशाचे ऋण व्यक्त करतो म्हणून समाज सेवेकडे दुर्लक्ष नको, अशा भावना आपल्या भाषणात त्यांनी व्यक्त केल्या. प्रसंगी उपजिल्हाधिकारी ललित कुमार वराडे यांनी विचार व्यक्त केले. संचलनाच्या माध्यमातून पत्रकार रणजीतसिंह राजपूत यांनी कार्यक्रमात रंग भरला. बारोमासकार सदानंद देशमुख यांनी प्रसंगी विचार व्यक्त केले. नीटनेटके आयोजन व वैचारिक कार्यक्रमावर भर यामुळे हा सोहळा लक्षवेधी ठरला.
सोहळे जीवंतपणी करा – तुपकर
तरुणांनो नेत्यांचे पोस्टर लावून वाढदिवस साजरा करण्यापेक्षा आपल्या मातापित्यांचे वाढदिवस व जीवंतपणी सोहळे करा, असे आवाहन यावेळी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केले. सध्याची परिस्थिती व भरकटलेला समाज यावर त्यांनी सडकून टीका केली. एकमेकांना मोठे करणे जमत नसेल तर किमान मागे तरी ओढू नका. आपण चांगल्या सामाजिक कार्याची दखल घेतली पाहिजे, असे ते म्हणाले. माणूस मेल्यानंतर कार्यक्रम केले जातात. परंतु जीवंतपणे त्या व्यक्तीविषयी एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले तर त्याला जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटते. कैलास राऊत यांनी आपल्या वडिलांचे गुणगौरव करण्यासाठी केलेला आजचा हा कार्यक्रम वेगळा असल्याचे सांगून तरुण वर्गाने जुन्या पिढीचा आदर करावा, असे आवाहन केले.