बुलढाणा (राजेंद्र घोराडे) – जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील पीकविमा नुकसानीचे सर्वेक्षण करताना स्थानिक तलाठी व अधिकारी यांनी एकाच अल्पभूधारक शेतकर्याची जमीन जर दोन वेगवेगळ्या गट क्रमांकमध्ये असेल तर कोणत्याही एकाच तुकड्यातील नुकसान गृहीत धरल्या जाईल, असे सुलतानी फर्मान चिखली तालुक्यातील शेतकर्यांसाठी काढले आहे. जेणेकरून अगोदरच तळ्यात-मळ्यात असलेली नुकसानभरपाई अगदीच तुटपुंजी होईल, तरी अश्या प्रकारचे आदेश त्वरित रद्द करून शेतकर्यांना पूर्ण नुकसानभरपाई न मिळाल्यास तालुका कृषी अधिकारी व तहसीलदार यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय सर्व शेलसूर व परिसरातील शेतकरी बांधवांनी घेतला आहे.
याबाबतीत बुलढाणा येथील आमदार संजय गायकवाड यांनी सर्व तलाठी यांची सभा घेऊन गट क्रमांक बघता शेतीक्षेत्र बघून सर्व नुकसानग्रस्त शेतकर्यांना त्वरित भरपाई देण्याचे आदेश संबंधिताना दिले आहेत, व या संबधित कोणतीही हयगय सहन केली जाणार नाही, असे स्पष्ट शब्दात अधिकारीवर्गाची कानउघडणी देखील केलेली आहे. अशाच प्रकारे चिखलीच्या आमदार सौ.श्वेताताई महाले पाटील यांनीदेखील तलाठी वर्गाला योग्य समज द्यावी, अशी मागणी सर्व शेलसूर व परिसरातील शेतकर्यांनी केली आहे.
—————