बुलढाणा (खास प्रतिनिधी) : मोताळा येथील प्रगती दिव्यांग स्वयंसहाय्यता बचतगट पापड उद्योगासाठी बचतगट प्रसिद्ध आहे. व्यवस्थापन, उत्पादन, विक्री, हिशोब आदी बाबींची उत्तम सांगड या बचतगटाने घातलेली आहे. दिव्यंगत्वार मात करीत बचतगटाच्या सदस्यांनी साधलेली प्रगती कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन राजर्षी शाहू सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदीपदादा शेळके यांनी केले. बचतगटाच्या पापड उद्योगाला २० एप्रिल रोजी त्यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी नीलेश पाटील, सुरेश सुरडकर, हमीद कुरेशी, निखिल शिंबरे उपस्थित होते. पुढे बोलतांना संदीपदादा शेळके म्हणाले, प्रगती दिव्यांग बचतगटाद्वारे दररोज ४० किलो पापड आणि २० किलो कुरडई तयार केली जाते. नागली पापड, तांदूळ मसाला तिखट पापड, बाजरी तिखट पापड, तांदुळ सांडोळी, गव्हाची रंगीत कुरडई, गव्हाची कुरडई, ज्वारी पापड, मका तिखट पापड त्यांच्याकडे मिळतात. चवदार पापड असल्याने संपूर्ण राज्यातून त्यांच्या पापडाला मागणी आहे. व्यवसाय वाढल्याने राष्ट्रीयीकृत बँका सुद्धा त्यांना अर्थसहाय्य करतात. मोताळा ग्रामीण बँकेच्या मॅनेजर सायली टेकाळे यांनी ‘स्टँड अप इंडिया’ मधून या बचतगटाला १३ लाख रुपयांचे अर्थसहाय्य दिले आहे.
अशी मिळाली पापड उद्योगाची प्रेरणा
साधारण सात- आठ वर्षांपूर्वी प्रगती दिव्यांग स्वयंसहाय्यता बचतगट स्थापन झाला. बचतगटात रेखा सुरडकर, मुक्ता मोकासरे, द्वारकाबाई सुरडकर, सुधाकर कोळसे आणि अमोल नागोकार असे पाच सदस्य आहेत. बचतगटाच्या अध्यक्ष रेखा सुरडकर यांचे माहेर जळगाव खान्देश जिल्ह्यातील आहे. खान्देशात पापड उद्योग खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे पापड व्यवसाय सुरु करण्याची संकल्पना पुढे आली.
ब्रॅण्डिंगसाठी पुढाकार घेणार!
प्रगती दिव्यांग बचतगटाला सुरुवातीस राजर्षी शाहू पतसंस्थेच्या माध्यमातून अडीच लाख रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले होते. याद्वारे त्यांनी व्यवसाय सुरु केला. त्यातून प्रगती साधली. आज हा बचतगट स्वतःच्या पायावर उभा आहे. येणाऱ्या काळात कॉमन फॅसिलिटी सेंटरच्या माध्यमातून या बचतगटाला पुणे, मुंबईची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ब्रॅण्डिंग करणार असल्याची ग्वाही संदीपदादा शेळके यांनी दिली.