BULDHANACrimeVidharbha

डाेक्यात दगड घालून निर्घृण खून; साखरखेर्डा हादरले!

– आठ दिवसांतून खुनाची दुसरी घटना उघडकीस

साखरखेर्डा (प्रतिनिधी) – येथील मुख्य वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यात आज रात्री एका इसमाचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर इसमाचे नाव गणेश शिंगणे असून, तो पिंपळगाव सोनारा येथील रहिवासी आहे. त्याचा दगडाने ठेचून खून केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

साखरखेर्डा बसस्थानक परिसरातील पशुवैद्यकीय दवाखान्यातील एका इमारतीसमोर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला इसम एका मुलाला सायंकाळी सात वाजताच्या सुमारास दिसून आला. लागलीच त्या मुलाने बसस्थानकावर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना ही माहिती दिली. पोलीस घटनास्थळी गेले असता एक ४५ वर्षीय इसम रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांना दिसला. लागलीच ही माहिती साखरखेर्डाचे ठाणेदार नंदकिशोर काळे यांना देण्यात आली. सदर इसमाच्या डोक्यात दगड टाकला असावा आणि त्याला किमान दोन तासांचा अवधी झाला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

या खुनाची माहिती वार्‍यासारखी पसरताच घटनास्थळी नागरिकांची एकच गर्दी जमली होती. पिंपळगाव सोनारा येथील सरपंच नितीन ठोसरे, माजी सरपंच तोताराम ठोसरे हेही त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी सदर इसम गणेश शिंगणे हा असून, तो पिंपळगाव सोनारा येथील रहिवासी असल्याचे सांगितले. ठाणेदार काळे, पोलीस कॉस्टेबल हुड, विनोद वैद्य या पोलीस कर्मचार्‍यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातून रूग्णवाहिका बोलावून सदर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला.

आज, २१ एप्रिलरोजी शुक्रवार असल्याने आठवडी बाजार भरलेला होता. पशुवैद्यकीय दवाखाना जेथे आहे तेथून फक्त १०० फुट अंतरावर हा मृतदेह पडलेला होता. सदर इसमाच्या डोक्यात भलामोठा दगड टाकल्याचा संशय येत असून, तो दगडही मृतदेहाच्या बाजूला रक्ताने माखलेल्या अवस्थेत पडलेला दिसून येत आहे. आठवडी बाजार असल्याने शिंदी, राताळी, सवडद, मोहाडी, लव्हाळा, मेरा जाणारे सर्व वाहने येथूनच भरले जातात. आज प्रचंड वर्दळ असतांनाही कोणाच्याही बाब लक्षात आली नाही, हे विशेष. वृत्त लिहिपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नाही. तथापि, या खुनाच्या अनुषंगाने महत्वपूर्ण तपास लावण्यात साखरखेर्डा पोलिसांना यश आले असून, आरोपीदेखील दृष्टीपथात आलेला आहे. लवकरच आरोपीला अटक केली जाणार असल्याचे पोलिस सूत्राने सांगितले आहे.
—————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!