बाजार समिती निवडणूक; मेहकर, चिखली, मलकापुरात ड़ाव साधला?, बुलढाण्यात फसला!
– सत्ताधार्यांकड़ून महाविकास आघाड़ीचे म्होरके टार्गेट?, वज्रमूठ आवळावी लागणार!
– शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची भूमिका बाजार समित्यांचा कौल पालटणार?
बुलढाणा (बाळू वानखेडे) – जिल्ह्यातील होऊ घातलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकांत चांगलीच चुरश निर्माण झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांची रणनीती अंतिम टप्प्यात आहे. सध्याचे चित्र पाहता महाविकास आघाडीची वज्रमूठ घट्ट दिसत असली तरी स्थानिक नेतृत्वांना ती आणखी घट्ट आवळावी लागणार आहे. तर सत्ताधारी शिंदे गट -भाजपकडून महाविकास आघाड़ीचे म्होरके टार्गेट केले जात असल्याचे राजकीय चित्र निर्माण झालेले आहे. त्यामुळेच मेहकर, मलकापूर, चिखली बाजार समितीत सत्ताधार्यांचा ड़ाव साधला गेला असून, बुलढाण्यात मात्र हा डाव चाणाक्षपणे उधळला गेला. अर्ज माघारीची उद्या (दि.२०) शेवटची तारीख असून, त्यानंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे, तर बहुतांश बाजार समित्यांवर महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा वरचष्मा राहिला असून, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची साथ ही महाविकास आघाडीला मिळणार असल्याने हे निकाल या पक्षांना अनुकूल लागतील, अशी जोरदार चर्चा होत आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर, लोणार, देऊळगाव राजा, चिखली, बुलढाणा, नांदुरा, मलकापूर, खामगाव, शेगाव व जळगाव जामोद या बाजार समित्यांसाठी निवड़णूक प्रक्रिया सुरू आहे. सदर निवड़णूक सर्वच प्रमुख पक्षांनी प्रतिष्ठेची केल्याने निवड़णुकीत चांगलीच रंगत येणार आहे. उद्या, (दि.२०) अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असल्याने नंतर चित्र स्पष्ट होणार आहे. सध्याची परिस्थिती पाहता सत्ताधार्यांकड़ून महाविकास आघाड़ीचे खच्चीकरण करण्यासाठीच की काय, आघाडीचे म्होरके ट्रार्गेट केल्याचे दिसत आहेत. मेहकर बाजार समितीमध्ये शिवसेना (ठाकरे) उपजिल्हाप्रमुख तथा पॅनल प्रमुख आशीष राहाटे तसेच काँग्रेसचे अनुसूचित जाती मतदारसंघातील उमेदवार सतिष ताजने यांचे उमेदवारी अर्ज दोघेही अनुदानीत शाळेवर कर्मचारी असल्याची तक्रार केल्याने बाद झाले आहेत. चिखली बाजार समितीतही अकरा उमेदवारांची अर्ज हे तक्रार केल्याने बाद झाले आहेत. विशेष म्हणजे, याबाबत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी पत्रकार परिषदसुध्दा घेतली होती. बुलढाणा बाजार समितीतही शिवसेना (ठाकरे) जिल्हाप्रमुख तथा बाजार समितीचे माजी सभापती जालींधर बुधवत यांचेकड़े अड़त लायसन्स असल्याने त्यांचेसह पाच जणांचे अर्ज बाद करावे, अशी तक्रार होती. परंतु, सबळ पुरावे दिल्याने त्यांचे अर्ज सध्यातरी कायम आहेत. मलकापूर बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष संतोष रायपुरे यांनी बाजार समितीत असंविधानिक पदाचा लाभ घेतल्याची तक्रार करत त्यांचाही अर्ज खारीज झाल्याने सध्यातरी ते निवड़णूक रिंगणाबाहेर गेले आहेत. एकंदरीत शिवसेनेसह (ठाकरे) महाविकास आघाडीला मिळणारी सहानुभूती पाहता शिंदेगट व भाजपा हे महाविकास आघाडीचे म्होरके टार्गेट करत असल्याचे दिसून येत आहे. या म्होरक्यांना निवडणूक रिंगणातून बाहेर केले म्हणजे निवड़णूक सोपी होईल, असा कदाचित त्यांचा अंदाज असावा. परंतु, हा अंदाज मतदार उधळून लावू शकतात, हे कदाचित सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या लक्षात येत नसावे. निवड़णूक म्हटली की रणनीती आलीच. परंतु, ही रणनीती फसू शकते, याची जाणीव सत्ताधारी पक्षाने ठेवण्याची गरज आहे. कारण राजकीय कुरघोड्या झाल्याने महाविकास आघाडीची सहानुभूती उलट वाढली आहे. या निवडणुकीत सिलेक्टेड मतदार असल्याने आता त्यांची भूमिका विरोधक व सत्ताधारी यांच्यासाठी निर्णायक ठरणार आहे. या निवडणुकीत दिवस कमी उरल्याने मतदारापर्यंत पोहोचणे सर्वांनाच जिकरीचे असले तरी तिककेच गरजेचेदेखील आहे. मेहकर, लोणार बाजार समितीत गेल्या २० वर्षांपासून खासदार प्रतापराव जाधव व आ.संजय रायमुलकर यांच्या अधिपत्याखाली सत्ता आहे. हा बुरूज ढासळण्यासाठी महाविकास आघाडीला मोठी कसरत करावी लागणार आहे. कारण खा. प्रतापराव जाधव यांचा दीर्घ अनुभव पाहता हे काम पाहिजे तेवढे सोपेही नाही, पण अशक्यही नाही. खामगाव बाजार समितीत माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी वंचित बहुजन आघाडी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतल्याने परिस्थिती भक्कम असल्याचे सांगितले जात असले तरी खामगाव विधानसभा पक्षनेते ज्ञानेश्वरदादा पाटील यांचा गट काय करतो, यावरही बरेचसे राजकीय गणित अवलंबून आहे. मलकापुरात माजी आ. चैनसुख संचेती व विद्यमान आ. राजेश एकड़े यांचे पॅनल आमने-सामने राहणार आहे.
एकंदरित बाजार समित्यांच्या निवडणुकीत जोरदार राजकीय चुरश निर्माण झालेली असून, ही निवड़णूक अटीतटीची होणार आहे. यातील बहुतांश बाजार समित्या या त्यांचा कार्यकाळ संपण्याअगोदर महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या ताब्यात होत्या. शिंदे गट व भाजप विषयी सिलेक्टेड मतदार तसेच जनतेचे मत पाहाता, त्या पुन्हा ताब्यात घेण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांना अनुकूल वातावरण आहे. या शिवाय, शेतकरी नेते रविकांत तुपकर हे त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे शिंदे ग्ाट व भाजपावर प्रचंड नाराज आहे. बाजार समिती निवडणुकीत तुपकरांना मानणारा मतदार मोठ्या प्रमाणात आहे. तर तुपकरांनी या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे निर्देश आपल्या मतदारांना केले असल्याची खात्रीशीर माहिती आहे. त्यामुळे त्याचाही फायदा महाविकास आघाडीतील घटक पक्षांना होणार आहे. उद्या गुरूवार ही अर्जमाघारीची शेवटची तारीख असून, मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज आल्याने माघारीसाठी पॅनल प्रमुखांचे नाकीनऊ येत आहेत तर बंड़ाळी झाल्यास त्याचा फटका संबंधित पॅनलला बसणार आहे, एवढे मात्र निश्चित.
चिखली बाजार समितीत आमदार श्वेताताई महाले यांची राजकीय परीक्षा!
सद्याच्या राजकारणात चिखली मतदारसंघ हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील बनला आहे. या बाजार समितीत विद्यमान संचालकांचे अर्ज बाद करण्याबाबत ज्या काही घडामोडी घडल्यात त्या पाहाता, या बाजार समितीच्या मतदारांत तीव्र नाराजी आहे. बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या नेतृत्वात भाजपसह शिंदे गटाने जोरदार कंबर कसलेली आहे. राजकीय डावपेचात त्यांना यश आल्याचे दिसत असले तरी, बाजार समिती ताब्यात ठेवण्यासाठी माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे यांनीदेखील जोरदार रणनीती आखली आहे. या निवडणुकीत त्यांना कोर्टकचेरीही करावी लागली. त्यांना महाविकास आघाडीचे नेते आ. डॉ. राजेंद्र शिंगणे व शिवसेना (ठाकरे) संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी जोरदार साथ दिली आहे. उद्या बंडखोरी होणार नाही, यासाठी या तीनही नेत्यांनी वैयक्तिक सर्व इच्छुकांशी संपर्क साधला आहे. दुसरीकडे, मिसाळवाडीसह इतर महत्वाच्या गावांत उपमुख्यमंत्र्यांचे सचिव तथा आमदारपती विद्याधर महाले पाटील यांनी स्वतः दौरा केला असल्याची माहिती हाती आली आहे. हा दाैरा राजकीय हाेता की गैरराजकीय ते आता निकालातूनच स्पष्ट होईल. मिसाळवाडीत त्यांनी त्यांचे जवळचे कार्यकर्ते व मिसाळवाडीचे उपसरपंच हनुमान मिसाळ यांच्यावर मोठी जबाबदारी साेपावली असल्याचेही सांगण्यात येतेे. दुसरीकडे, आ. श्वेताताईंनीदेखील ग्रामपंचायत सदस्य, सेवा सोसायट्यांचे सदस्य, पदाधिकारी, तसेच इतर मतदारांच्या बैठका घेतल्या आहेत. तसेच, आपले सर्व निकटवर्तीय व भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते कामाला लावले आहेत. त्यामुळे चिखली बाजार समिती ताब्यात घेण्यात आ.श्वेताताईंना यश येते, की राहुलभाऊ बोंद्रेच पुन्हा एकदा बाजार समितीवर झेंडा फडकवितात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
————–