लगीनघाईचा हंगाम सध्या सुरु झालांय. ‘कपड्यांचा बस्ता’ तसा खूप महत्वाचा, पण ‘ऐतिहासीक दस्ता’वेज जर एखाद्या लग्नातून पुढे येत असेलतर.. तो विषय वर्तमानात महत्वाचा ठरतो. ‘ईशिता’ व ‘मयूर’च्या ‘लग्नाचं आवतण’ देणारी एक पत्रिका सध्या महाराष्ट्राच्या पुरोगामी सांस्कृतिक पटलावर चर्चेची ठरत आहे. ‘शिवविवाह सोहळा’ असं या पत्रिका म्हणण्यापेक्षा ‘पत्रिका पुस्तक’ म्हणावं, अशा निमंत्रण पुस्तिकेतून पाषाणातील पुरोगामी शिल्पांना चित्राच्या माध्यमातून स्थान देण्यात आले असून.. ‘शिव-पार्वती’ विवाहापासूनचा हा शिवप्रवास सामाजिक उत्थानाचे कार्य केलेल्या दाम्पत्याच्या ऐतिहासीक नोंदीपासून ‘ईशिता-मयूर’च्या विवाहापर्यंत कल्पकतेने साकारण्यात आला आहे. शिवमती ज्योती व शिवश्री चंद्रशेखर शिखरे या मराठा सेवा संघाच्या चळवळीत कार्यरत असणाऱ्या दाम्पत्याच्या ‘जिजाऊ’चा अर्थात लेकीचा हा विवाह सोहळा आहे.
‘जिजा माऊली गे तुला वंदना ही,
तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्त दाही।’
या ‘जिजाऊ वंदना’पासून पत्रिकेचा राजमाता जिजाऊ माँ साहेबांच्या तैलचित्रासह आरंभ होतो. लग्नाचं आवतंण देतांना ज्योती व चंद्रशेखर शिखरे यांनी समाजातील अनेक दाम्पत्यांनी आपल्या कृतार्थ सहजीवनातून एक आदर्श उभा केला आहे, यापैकी काही दांपत्यांच्या जीवनाचा संक्षिप्त गौरवपट पुढे आणला आहे. त्यांच्यापैकी काही महानायिंकाचा उज्वल जीवनपटही पुढे ठेवण्याचा प्रयत्न या पत्रिकेतून करण्यात आला आहे. पती-पत्नी, कुटुंब व कौटुंबिक जीवन तथा समाजाविषयी सखोल अभ्यासांती केलेले चिंतन याचाही समावेश या निमंत्रण पत्रिकेत असून आपण खटाटोप समजून व गोड मानून घ्यालच ही खात्री पत्रिकेच्या सुरुवातीलाच आवतन देताना व्यक्त करण्यात आली आहे.
‘विवाहाचा जो संस्कार, त्याचे महत्व सर्वात थोर..
त्या पायावरीच समाज मंदीर, म्हणोनी सुंदर करा यासी।’
या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगितेतील ओवी नमूद करुन शिवविवाहाची संकल्पना विषद केली आहे. पुरुष प्रकृतीशिवाय व शिव पार्वतीशिवाय अपुर्ण असतो, त्याच पुरुषाचे प्रकृतीशी व शिवाचे पार्वतीशी जीवनाचे नाते प्रस्थापित करुन देण्याचा संस्कार म्हणजेच शिवविवाह संस्कार. शिवविवाह हा एक निरोगी, बुध्दीमान, कर्तृत्ववान व सृजनशील दाम्पत्य संस्कारीत करण्याचा विधी असून कालबाह्य कर्मकांडांना नकार देत उच्च मानवी प्रगत मूल्याचा स्विकार हे तत्व असल्याचे यात सांगितले आहे. पुरोहीतशाहीला फाटा देत धान्यांच्या अक्षदापासून होणारी अन्नाची नासाडी थांबविण्याचाही संदेश या शिवविवाह पत्रिकेत आहे.
‘शिव-पार्वती विवाह’ कथा, महाराणी देवी व सम्राट अशोक यांचे कृतार्थ सहजीवन, संत सोयराबाई आणि संत चोखामेळा या वारकरी परंपरेचा मानबिंदू दाम्पत्य यांचा विवाहभाव ‘चोखा माझा जीव चोखा माझा भाव। कुलधर्म देव चोखा माझा।।’ ओवीतून रेखाटला आहे. जिजाऊ व शहाजीराजे यांचा १२ नोव्हेंबर १६१० ला वेरुळ येथे झालेला विवाह ते ६ जून १६७४ ला रयतेच्या राजाचे स्वप्न प्रत्यक्षात येवून शिवराय छत्रपती झाल्याचा इतिहास, ‘अशी कशी तुकयाची अवलाई। ऐका हो तिची नवलाई।।’ या ओवीतून १२ मे १६३२ रोजी झालेला अवली व संत तुकारामाचा विवाह, सन १६४१ मध्ये सईबाई व छत्रपती शिवरायांचे सुरु झालेले सहजीवन ‘सती शीलवती रम्या, गुण रुपे उज्वला। मिळाली राजास भार्या, पवार कुलसंभवा।।’ यातून नमूद केला आहे.
सखी राज्ञी येसूबाई व छत्रपती संभाजी यांचा २५ डिसेंबर १६६४ला शृंगारपुरीतील विवाह, ज्ञानज्योती सावित्रीबाई व महात्मा ज्योतीबा फुले यांचा २४ मे १८४०ला झालेला विवाह, महाराणी चिमणाबाई व महाराजा सयाजीराव गायकवाड या राजेशाही दाम्पत्याचा २८ डिसेंबर १८८५ला प्रेरणा देणारा विवाह, महाराणी लक्ष्मीबाई व राजर्षी शाहू महाराजांचा १ एप्रिल १८९१ रोजी झालेला विवाह, रयतमाऊली लक्ष्मीबाई व कर्मवीर भाऊराव पाटलांचा सन १९०९ला झालेला विवाह, रमाई व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा सन १९०६ला झालेला विवाह दाम्पत्य जीवनाचा आदर्श घालून देणारा होता. जागतिक कीर्तीचे प्रकांड पंडित डॉ. बाबासाहेब आणि निरक्षर रमाई यांनी परस्परांवरील प्रेम, त्याग आणि समर्पण या आधारे प्रतिकूल परिस्थितीवर मात करून दाम्पत्य जीवनाचा आदर्श घालून दिल्याचे यात नमूद आहे.
विमलबाई तथा पंजाबराव देशमुख, कॅप्टन लिलावती व स्वातंत्र्यसेनानी डॉ.उत्तमराव पाटील यांचा १९३८ मध्ये सत्यशोधकी विवाह, अशा अनेक वैवाहीक नोंदी या पत्रिकेत आहे. कालजयी महानायिका जिज्ञासक महदंबा, संत जनाबाई, संत मुक्ताई, अक्कमहादेवी, संत बहिणाबाई पाठक, केळदीची राणी चन्नम्मा, महाराणी ताराबाई, सरसेनापती उमाबाई दाभाडे, महाराणी अहिल्यादेवी होळकर, वीर झलकारी, फातिमाबी शेख, मुक्ता साळवे, ताराबाई शिंदे, रखमाबाई राऊत, बहिणाबाई चौधरी, सरोजिनी नायडू यांच्याही कर्तृत्वावर प्रकाश पत्रिकेतून टाकण्यात आला आहे.
पती-पत्नीसंबंधी महापुरुषांची जीवनसुक्ते पत्रिकेतून मांडण्यात आली असून त्यात भगवान महावीर, महात्मा बसवेश्वर, संत सावता महाराज, संत नामदेव, संत रविदास, तथागत गौतम बुद्ध, महात्मा चक्रधर, संत गोरोबा, संत ज्ञानेश्वर, संत कबीर, गुरु ग्रंथसाहिब, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, प्रबोधनकार ठाकरे, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, संत सेवालाल महाराज, राष्ट्रसंत गाडगे महाराज, दिनकरराव जवळकर, वीर भगतसिंग व शाहीर अमर शेख यांची जीवनसुक्ते प्रतिपादित केली आहे.
प्रागतिक विचारांचा शिखरे परिवार व शिवभूमीतील डोंगर परिवार यांच्या जुळलेल्या ऋणानुबंधावर दृष्टीक्षेप टाकून नवरी ईशिता व नवरदेव मयूर यांचा परिचय, अन् शिवस्नेह प्रगट करुन शिवविवाह सोहळ्याचे अंत:करणपुर्वक निमंत्रण शेवटी देण्यात आले आहे.
मनमिळाऊ, शांत व निडर स्वभाव असलेली ‘इशिता’ सध्या म्यूनीच जर्मनी येथे उच्च पदावर काम करत असून, ऐतिहासिक वारसा व शिक्षणाची आवड यातून ‘मयूर’ आपली यशस्वी वाटचाल करत असून तोही म्यूनिच जर्मनी येथे मॅनेजमेंट कन्सल्टंट या उच्च पदावर कार्यरत आहे. या दोघांचा विवाह सोहळा रविवार २३ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ७ वाजता छत्रपती संभाजीनगर येथे सोत्साह संपन्न होणार आहे.
या पत्रिका पुस्तिकेचे लेखन व संकलन गंगाधर बनबरे व चंद्रशेखर शिखरे यांनी केले असून, किरण बागुल व विक्रम जाधव यांची संकल्पना आहे. मिलिंद विचारे यांचे चित्र असून किशोर कडू यांनी या गोड पत्रिकेची निर्मिती केली आहे. तर असं आहे हे, ऐतिहासिक दस्तावेज असलेलं लग्नाचं आवतंण!
(श्री राजेंद्र काळे हे विदर्भातील आघाडीचे दैनिक ‘देशाेन्नती’चे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी असून, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे सल्लागार संपादक आहेत.)