– कामगार व कर्मचारीवर्गाच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारचे कंपन्यांना पत्र
नवी दिल्ली (प्रतिनिधी) – पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश, बिहार, ओडिशा, राजस्थानसह देशातील अनेक राज्यांमध्ये तापमानात वाढ झाली असून, उष्णतेची लाट आली आहे. पश्चिम बंगाल आणि त्रिपुरात उष्माघाताच्या रूग्णांचे प्रमाण वाढल्यामुळे शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तर काही राज्यांमध्ये शाळेच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे. पुढील तीन दिवसात झारखंड, बिहार, सिक्कीम, ओडिशा या राज्यातील तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने बिहारच्या सहा जिल्ह्यांमध्ये उष्माघातासाठी ऑरेंज अॅलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्रातील विदर्भ, ठाणे या भागातही जोरदार तापमानवाढ झाली आहे.
दरम्यान उष्णतेच्या लाटेपासून कामगार आणि कर्मचारी वर्गाचा बचाव करण्यासाठी श्रम आणि रोजगार मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सचिवांना पत्र लिहिले आहे. व्यापारी, बांधकाम कंपन्या आणि उद्योगांना त्यांच्या तेथे काम करणार्या कामगार वर्गासाठी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश या पत्रातून दिले आहेत. यामध्ये कर्मचारी आणि कामगारांच्या कामाच्या तासांचे पुनर्नियोजन करणे, कामाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पुरेशी सोय सुनिश्चित करणे, बांधकाम कामगारांना आपत्कालीन आईस पॅक आणि उष्णताजन्य आजार प्रतिबंधक साहित्याची तरतूद करणे, नियमितपणे आरोग्य विभागाशी समन्वय साधणे यांचा समावेश आहे. कामगारांची आरोग्य तपासणी, नियोक्ता आणि कामगारांसाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे जारी केलेल्या आरोग्य सल्ल्याचे पालन करण्यात यावे, असं स्पष्ट केले आहे.