बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – राज्यातील शेतकरी ज्या पारंपरिक पद्धतीवर विश्वास ठेवतात ती जिल्ह्यातील भेंडवळ येथील प्रसिद्ध घटमांडणी येत्या शनिवारी म्हणजेच अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी भेंडवळ गावात होणार आहे. शेतात खड्डा, खड्ड्यात मातीचा घट, घटात पाणी आणि त्यावर कुरडया, त्याच्या बाजूला पान सुपारी आणि विविध १८ प्रकारची धान्ये, अशा या ‘घट मांडणी’तून वर्षभराचा हंगाम, पीक, पाऊस अर्थव्यवस्था, संरक्षण व्यवस्था आणि राजकीय घडामोडींचा अंदाज वर्तवला जातो. तपस्वी चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज हे निसर्गातील घडामोडींचे निरीक्षण करून अंदाज जाहीर करत असतात.
पर्जन्यमान, पिकांची स्थिती, शेतीमालाचे दर, देशातील राजकीय आणि आर्थिक स्थितीबाबत भेंडवळमध्ये दरवर्षी भविष्यवाणी करण्यात येते. गेल्या ३५० वर्षांपासून या घट मांडणीच्या आधारावर वर्षभराचे राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि हवामानाचे भविष्य वर्तवले जाते. या बाबीला काहीही वैज्ञानिक आधार नसला आणि बहुतांश भविष्यवाणी खरीही होत नसली तरी राज्यातील काही भागातील शेतकरी या पद्धतीवर विश्वास ठेवून आहेत. शेती आणि पावसाविषयक निसर्गाचा सूक्ष्म अभ्यास गुढीपाडवा ते अक्षय्य तृतीया या काळात करुन वर्षभराची भाकिते या घट मांडणीत करण्यात येतात. ३५० वर्षांपूर्वी महान तपस्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी ही घट मांडणी सुरु केली होती. आता त्यांचे वंशजही परंपरा कायम ठेवून आहेत.
—————