इचलकरंजी (प्रतिनिधी) – ‘राज्यातील सर्व वीज ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेव मागणीची संपूर्ण रकमेची बिले महावितरण कंपनीने या महिन्यात लागू केली आहेत. यासंबंधी ग्राहकांमध्ये अद्यापही खूप मोठ्या प्रमाणात संभ्रम आहे. ज्या ग्राहकांना एकरकमी भरणा शक्य नाही, अशा ग्राहकांनी ही रक्कम सहा हप्त्यांत भरावी. अथवा तेही शक्य नसल्यास २० किलोवॉटपेक्षा कमी जोडभार असलेल्या ग्राहकांनी प्रीपेड मीटरची मागणी करावी, म्हणजे कोणतीही सुरक्षा ठेव भरावी लागणार नाही. तसेच २ टक्के वीजदर सवलतही मिळेल.’ अशी माहिती महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष व वीजतज्ञ प्रताप होगाडे यांनी जाहीर प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रसिध्दीस दिली आहे.
सुरक्षा ठेव रक्कम पूर्वी एक महिन्याच्या बिलाइतकी होती. नवीन विनियमांनुसार एप्रिल २०२२ पासून ती दुप्पट म्हणजे दोन महिन्यांच्या बिलाइतकी करण्यात आली आहे. त्यानुसार गेल्या वर्षी एप्रिल २०२२ मध्येही ही मागणी बिले आलेली होती. त्यावेळी ज्यांनी भरणा केला नाही, त्यांना यावर्षी पुन्हा बिले पाठविण्यात आली आहेत. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने ही रक्कम भरण्यासाठी विनियमांमध्ये सहा हप्त्यांची सवलत दिलेली आहे. महावितरणने ग्राहकांवर एकरकमी संपूर्ण रकमेची मागणी बिले लागू केली आहेत व त्या बिलांमध्ये ही रक्कम ६ महिन्यांत ६ हप्त्यांत भरता येईल, अशी माहिती इंग्रजी भाषेत दिली आहे. ग्राहकांनी खालील तपशीलवार माहितीच्या आधारे आपल्या परिस्थितीनुसार योग्य तो निर्णय घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
संघटनेच्यावतीने ग्राहकांना सूचना व शिफारशी पुढील प्रमाणे –
ज्या ग्राहकांना शक्य असेल, त्यांनी अतिरिक्त सुरक्षा ठेव मागणी रक्कम एकरकमी भरावी. ज्यांना एकरकमी भरणा शक्य नाही, अशा ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेव रक्कम भरणा करण्यासाठी विनियमांनुसार व बिलावरील माहितीनुसार ६ हप्ते उपलब्ध आहेत. त्यामुळे ही रक्कम ६ समान मासिक हप्त्यांत भरता येईल. त्यासाठी कोणत्याही कार्यालयात कोणतीही अडचण येण्याचे कांहीही कारण नाही.
ज्या ग्राहकांची रक्कम मोठी आहे व कोणत्याही आर्थिक अडचणीमुळे रक्कम हप्त्याने भरणेही शक्य नाही, अशा ग्राहकांनी पत्राद्वारे प्रीपेड मीटर पर्यायासाठी अर्ज करावा. प्रीपेड मीटरसाठी सुरक्षा ठेव आवश्यक नाही. तथापि २० किलोवॉटचे आतील जोडभार असलेल्या ग्राहकांसाठीच ही सुविधा उपलब्ध आहे. प्रीपेड मीटरचा पर्याय स्वीकारला तर सध्याची जमा सुरक्षा अनामत रक्कम ग्राहकाच्या प्रीपेड खात्यामध्ये वर्ग केली जाईल व त्यामधून त्याच्या पुढील वीज वापराची रक्कम वजा करण्यात येईल. तसेच प्रीपेड मीटर ग्राहकांना वीज आकार व इंधन समायोजन आकार यामध्ये अतिरिक्त २ टक्के वीज दर सवलत उपलब्ध आहे. ग्राहकांनी अर्ज दाखल केल्यानंतर संबंधित कार्यालयाच्या सही शिक्क्याची पोचपावती घ्यावी. असा अर्ज केल्यानंतर महावितरण कंपनी अतिरिक्त सुरक्षा ठेवीसाठी सक्ती करु शकत नाही. तसेच देयक रक्कम भरण्यासाठी कोणता पर्याय निवडायचा हा ग्राहकांचा हक्क आहे. त्यामुळे कंपनी ग्राहकांची कोणत्याही पर्यायाची मागणी नाकारू शकत नाही. प्रीपेड मीटरसाठी संबंधित वीज ग्राहकांनी संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता यांचेकडे अर्ज करावा.
२० किलोवॉटचे वर जोडभार असलेल्या वीज ग्राहकांना महावितरण कंपनीकडून ग्राहकांना पुरवठा केलेल्या वीजेसाठीच्या आकारांचा आगाऊ भरणा करण्याची सुविधा उपलब्ध आहे. आगाऊ भरणा केल्यानंतर आगाऊ म्हणून घेतलेल्या रकमेची ग्राहकाला पोच पावती मिळेल व पुढील मासिक बिलामध्ये वजावट दाखविली जाईल. तथापि या योजनेत वीजदर सवलत अत्यंत अल्प आहे. तसेच सुरक्षा ठेव किती आवश्यक आहे वा नाही याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. त्यामुळे हा पर्याय योग्य नाही.
————