बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्हा सामान्य रुग्णालय येथे सर्व जाती-धर्माचे व वंचित घटकातील सर्व सामान्य जनता उपचार घेत असतात, परंतु आता सामान्य रुग्णालयाने नवीन शक्कल लढविली आहे? आता पेशंट भरती होण्यासाठी आले असता त्यांना भरती पूर्व फॉर्म भरून त्यावर जातीचा(caste) रकाना भरण्यास सांगण्यात येते व जात विचारण्यात येते. जातीव्यवस्थेला पोषक ठरुन विषमता पेरणारी ही अट रद्द करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे बुलढाणा शहराध्यक्ष मिलींद वानखडे यांनी 18 एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद आहे की, जिल्हा सामान्य रुग्णालय बुलडाणा हे शासकीय रुग्णालय असून या ठिकाणी सर्व जाती धर्मातील, आर्थिक व दुर्बल घटकातील रुग्ण औषधोपचार घेण्यासाठी येत असतात. परंतू रुग्णालयात रुग्ण भरती करीत असतांना केस पेपरवर प्रत्येक रुग्णाची माहिती भरत असतांना जातीचा उल्लेख केला जातो आहे. त्यामुळे त्या रुग्णाची जी जात आहे, ती जात सांगावीच लागते. परिणामी या जातीमुळे आणखी जातीभेद निर्माण होवून रुग्णास आवश्यक व वेळेवर औषधोपचार होईल कि नाही ? हा संशोधनाचा एक गंभीर विषय बनला आहे. केस पेपर वरील हा रकाना समाजात दरी निर्माण करून जाती भेदास चालना देणारा आहे, सामाजिक सौहार्द कायम राखण्यासाठी केस पेपरवरील भरावयाच्या माहितीमध्ये जातीचा उल्लेख टाळण्यात यावा. त्यामुळे सर्व जातीच्या धर्माच्या रुग्णांना नियमित व वेळेवर औषधोपचार होईल. परिणामी रुग्णांची हेळसांड होणार नाही. अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे बुलढाणा शहराध्यक्ष मिलिंद वानखडे यांनी दिला आहे.
निवेदन देतेवेळी वंचित बहुजन आघाडी बुलढाणा शहर अध्यक्ष मिलिंद वानखडे, जिल्हा सचिव समाधान जाधव, दिलीप राजभोज, विजय राऊत, आझाद हिंद शेतकरी संघटनेचे ऍड सतिशचंद्र रोठे, शे.अनिस शे.भिकन, सचिन वानखडे, शे.नईम शे.अन्वर, राजु वानखडे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.