Breaking newsBULDHANAChikhaliHead linesVidharbha

गिरोली, चंदनपूर येथे भीमजयंतीला गालबोट लावण्याचा प्रयत्न अंढेरा पोलिसांनी हाणून पाडला!

– दोन्ही गटांना पोलिस अधीक्षकांच्या शांततेच्या आवाहनानंतर अंढेरा पोलिस ठाणेहद्दीत सौहदर्यपूर्ण शांतता!

देऊळगावराजा/चिखली (तालुका प्रतिनिधी) – चिखली तालुक्यातील चंदनपूर व देऊळगावराजा तालुक्यातील गिरोली बुद्रूक येथे कालच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शांततापूर्ण जयंतीला गालबोट लावण्याचा प्रयत्न अंढेरा पोलिसांनी हाणून पाडला आहे. काही समाजकंटकांनी हेतुपुरस्सर वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला होता. गिरोली बुद्रुक येथील मिरवणुकीत झेंड्याच्या वादावरून एका युवकावर चाकूने वार करण्यात आला. याप्रकरणी अंढेरा पोलिसांनी आज गुन्हे दाखल केले. या घटनेतील गंभीर जखमीला जालना येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. दुसरीकडे, चिखली तालुक्यातील चंदनपूर येथे मिरवणुकीत काही लोकांनी वाद घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरूनही काल रात्री तणाव निर्माण झाला होता. त्याचे पडसाद आज मेरा बुद्रूक येथे उमटले. काही समाजकंटकांनी पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करून वातावरण चिघळविण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी तातडीने दंगाकाबू पथला पाचारण करत, परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. पोलिस अधीक्षक सारंग आवाड, एसडीपीओ सचिन कदम, ठाणेदार गणेश हिवरकर यांनी दोन्हीही समाजाला समजावून सांगत, तणाव निवळला आहे. भीमजयंतीला गालबोट लावण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर पोलिस कायदेशीर कारवाई करत आहेत. दरम्यान, या दोन्ही प्रकरणात निष्पाप व घटनेशी संबंध नसलेल्या युवकांवर विनाकारण गुन्हे दाखल न करण्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे. तरुणांच्या आयुष्याचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेऊ, असे पोलिस अधिकारी म्हणालेत. पोलिस अधीक्षक हे स्वतः सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती जिल्ह्यात शांततेत व उत्साहात साजरी झाली. परंतु, या जयंतीला चिखली व देऊळगावराजा तालुक्यांत काही समाजकंटकांनी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. चंदनपूर येथे काही लोकांनी वाद घालण्याचा प्रयत्न केला. परंतु, ती परिस्थिती अंढेरा पोलिसांनी निवळली असताना, आज पुन्हा मेरा बुद्रूक येथे काही जणांनी पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली. वाहनांचे नुकसान झाल्याने पोलिसांनी दंगाकाबू पथकाला पाचारण केले. वरिष्ठ अधिकार्‍यांनी दोन्ही समाजाला शांत केले असून, आता मेरा बुद्रूकसह चंदनपूर येथे शांतता आहे. दुसरीकडे, गिरोली येथे शुक्रवार, १४ एप्रिलला रात्री उशिरा जयंती मिरवणूक सुरू होती. रात्री नऊ वाजेच्या सुमारास फिर्यादी विकास मगरे (वय १९, रा. गिरोली बु.) हा झेंडा फिरवीत होता. यावेळी तिथे असलेल्या करण तांबेकर व अर्जुन तांबेकर (रा. गिरोली) यांनी विकाससोबत वाद घातला. आरोपी अर्जुन याने विकासच्या मानेजवळ चाकूने वार केला. यावेळी तिथे असलेल्या हर्षवर्धन देशमुख व स्वप्निल झिने यांनी त्याला सोडविले. जखमी विकासला अगोदर देऊळगावराजा व नंतर जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी अंढेरा पोलिसांनी आरोपी करण व अर्जुन तांबेकर या भावंडांविरुद्ध भादंविच्या कलम ३०७ आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३ (२), (व्ही) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास बुलढाणा उपविभागीय अधिकारी सचिन कदम यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

अन्य घटनेत, चिखली तालुक्यातील चंदनपूर येथे काही समाजकंटकांनी मिरवणुकीला गालबोट लावले. त्यामुळे काल रात्री तणाव निर्माण झाला होता. दोन गटात हाणामारी झाल्याने ग्रामस्थांनी तातडीने याबाबत अंढेरा पोलिसांना कळवले. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार गणेश हिवरकर, दुय्यम ठाणेदार मनोज वासाडे, बीट अमलदार पोफळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेवून प्रकरण शांत केले. या प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अंढेरा पोलिसांनी फिर्यादी होत, तसेच परस्परविरोधी तक्रारींवरून दोन्हीही गटांतील एकूण १७ आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.  चंदनपूर येथे शांतता असताना आज अचानक काही तरुणांनी पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली. त्यामुळे तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याने पोलिसांनी दंगाकाबू पथकाला पाचारण केले होते. सद्या मेरा बुद्रूक व चंदनपूर येथे अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली असून, पोलिस अधीक्षक सारंग आवाड यांनी घटनास्थळाला भेट देऊन दोन्ही गटांना शांततेचे आवाहन केले आहे. सद्या अंढेरा पोलिस ठाणेहद्दीत शांतता असल्याची माहिती ठाणेदार गणेश हिवरकर यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ला दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!