बुलढाणा (संजय निकाळजे)- भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती जिल्हाभरात १४ एप्रिल रोजी विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, प्रशासनाच्या वतीने विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरी करण्यात आली. याप्रसंगी जिल्ह्यातील शहरासह गाव- खेड्यात आणि वाडी वस्त्यांमध्ये व्याख्यान, विविध स्पर्धा, प्रबोधनात्मक कार्यक्रम, रक्तदान शिबिरासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी शहर तथा ग्रामीण भागातील बुद्ध विहार तथा पुतळ्यांसमोर प्रत्येकाने मेणबत्ती लावून बाबासाहेबांना वंदन केले. सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी या महामानवाला अभिवादन मिरवणुकीमध्ये प्रचंड जनसागर उसळला आणि निळ्या पाखरांच्या जयभीम जयघोषाने आसमंत सुद्धा निनादला.
विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी १४ एप्रिल या त्यांच्या जयंतीनिमित्त भीमसागराला अक्षरशः भरती आली होती. निळे आकाश धरतीवर अवतरल्या सारखे जणू भासत होते. ग्रामीण भागात तसेच शहरातील प्रत्येक रस्ता निळ्या पाखरांनी फुलला होता. विविध रस्ते व मार्गांनी काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये हातात निळे झेंडे घेऊन तरुणाई ढोल ताशा डीजेच्या तालावर नाचत होती. माझ्या भिमान..भिमान माय, सोन्याने भरली ओटी… भिमाच गाण डिजेला वाजत..या गाण्यासह अनेक गाण्यांवर भीमसैनिक नाचत होते, तर जयंती असल्यामुळे अनेक गावांमध्ये गाण्यांच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. बाबासाहेबांच्या जयंतीच्या अनुषंगाने कवी गायकांनी सादर केलेल्या गाण्यांमध्ये मध्ये कवी गायक प्रीतमकुमार मिसाळ लिखित ही कसली ही, कसली ही, कसली पहाट आली, जुनाट झाली जन्माला पुन्हा गौतमा रामजीच्या कुटी, माता भिमाईच्या पोटी जन्मी आले बाळ.. भीमा हे गीत तसेच कवी गायक संजय निकाळजे यांनी लिखित अरे हाय..अरे हाय..अरे हाय, भीम बाबाची आज, जयंती हाय…! या गाण्याला आणि कवी गायक प्रदीप गवई यांच्या १४ एप्रिल दिनाचं महत्त्व खूप हाय र.. काय डीजे, काय वाजे, काय साजे, भिमाची जयंती आहे र… ह्या गाण्यांना अनेक गायकांनी पसंती देऊन श्रोत्यांसमोर गायन केले. यासह विविध भीम गीतांनी आसमंत गर्जत होता. सर्वत्र उत्साह, जल्लोषाचे चित्र डोळ्याचे पारणे फेडत होता. जयंती उत्सव सोहळ्यातील लहान थोरांच्या सहकुटुंब परिवारातील सदस्य आनंद द्विगुणीत करत होता.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाला १४ एप्रिलच्या पूर्व संध्येला रात्री १२ वाजता घड्याळाच्या ठोक्यापासूनच आरंभ झाला. विद्युत रोषणाई अन फटाक्याच्या नानाविध रंगछटांनी आकाश उजळून निघाले होते. रात्री १३ वाजता शहरासह ग्रामीण भागात बुद्धविहार पुतळा परिसरात हजाराच्या जन समुदायाने फटाक्यांची आतषबाजी केली. १४ एप्रिलची पहाट तर निळ्या पाखरांच्या प्रचंड गर्दीची ठरली. बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर येऊन त्यांना अभिवादन करण्यासाठी पहाटेपासून उपासक, उपासिका, अनुयायी लोकप्रतिनिधी, विविध पक्षाचे, संघटनांचे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती पेटवून माथा ठेकवत अभिवादन केले. याप्रसंगी प्रत्येक ठिकाणचे बुद्ध विहार पुतळा परिसरात रोशनाई आणि झगमगटात दिसत होता. दुपारनंतर शहरात तथा ग्रामीण भागात सार्वजनिक मिरवणूक निघण्यास सुरुवात झाली. शुभ्र पांढरी वस्त्र परिधान करून उपासक- उपासिका मिरवणुकीत सहभागी झाले होते. तरुणाईच्या डोक्यावर निळे फेटे, गळ्यात निळा रुमाल आणि जयभीमचा जयघोष व डीजेवरील भीम गीत त्यामुळे मिरवणुका डोळ्याचे पारणे फेडत होता. डीजेच्या गाण्यावर तरुणाई ताल धरत होती. मिरवणुकीदरम्यान अनेक संघटना पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी चहापाण्याची सुद्धा व्यवस्था केली होती. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भीम जयंती सोहळा अभूतपूर्व ठरला.