बिबी (ऋषी दंदाले) – बिबी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने पुतळ्याची भव्य सजावट करून, परिसरात दिव्यांची रोषणाई करून, १४ एप्रिलरोजी विविध ठिकाणी भव्य मिरवणूक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त बिबी ग्रामपंचायतीच्यावतीने वाचनालयाला पुस्तक आणि कपाट भेट देण्यात आले.
सर्वप्रथम बिबी येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर गावातील ग्रामपंचायत, राजर्षी शाहू मल्टीस्टेट, मातोश्री महिला अर्बन, बँक, अद्विका महाविद्यालय, वसंतराव नाईक महाविद्यालय, शाळा, कॉलेज अशा विविध ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला. यावेळी संविधान लिहिलेले बॅनर, बाबासाहेबांची प्रतिमा चित्ररथाची गावातून ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक मार्गावर किशोर निंबेकर यांनी मिरवणुकीत सहभागी झालेल्या भीमसैनिकांना थंड पाणी आणि शरबतचे वाटप केले, तर मुस्लिम बांधवांनी मशीदसमोर मिरवणुकीत थंड पाणी वाटप केले. यावेळी जय भीमच्या गजरात गीत, पोवाडे, देशभक्तीपर, थोर महापुरुषांची, गाणी गात लहान, थोर, महिला, पुरुष, मुलं-मुली यांनी सहभाग घेऊन उत्साहात जयंती साजरी केली. यावेळी बिबी पोलिस ठाण्याचे ठाणेदार सदानंद सोनकांबळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी गावातील भीमसैनिकांनी शांततेत कार्यक्रम यशस्वी केला.
—————