बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज दि. १५ एप्रिलरोजी जिल्ह्यात येत असून, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. तसेच वीज पडून मृत्यू पावलेल्या कवळे यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेणार आहेत.
जिल्ह्यात अवकाळी पावसाने कहर केला. यामुळे रब्बीसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले. सात एप्रिल रोजी खामगाव तालुक्यात वादळ व विजेच्या कड़कड़ाटात तुफान अवकाळी पाऊस पड़ला. यामुळे कारेगाव, चितोड़ा, पळशीसह इतर भागात मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी जीवितहानीसुध्दा झाली. यामध्ये चितोड़ा येथील शेतकरी गोपाल महादेव कवळे यांचा वीज पड़ून मृत्यू झाला होता. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज, १५ एप्रिल रोजी जिल्ह्यात येत असून, दुपारी दोन वाजता तालुक्यातील चितोड़ा शिवारातील नुकसानीची पाहणी करणार आहेत. चितोड़ा येथील वीज पड़ून मृत्यू पावलेल्या गोपाल कवळे यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेणार आहेत. याप्रसंगी शिवसेना (ठाकरे) जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांच्यासह विविध पदाधिकारी त्यांच्या सोबत असणार आहेत.