– बसमध्ये ४० प्रवासी, अद्यापही शोधमोहीम सुरू!
मुंबई/रायगड (जिल्हा प्रतिनिधी) – रायगड जिल्ह्यातील खोपोली परिसरात जुन्या मुंबई महामार्गावरून जाणारी गोरेगावातील सुखकर्ता ट्रॅव्हल्सची बस खोल दरीत कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात १३ प्रवासी जागीच ठार झाले असून, २५ प्रवाशांना वाचविण्यात बचाव पथकाला यश आलेले आहे. या बसमध्ये ४० प्रवासी होते, त्यामुळे इतर प्रवाशांचा दरीत शोध घेतला जात होता. खंडाळा व खोपोलीच्या दरम्यान असलेल्या शिंगरोबा घाटात आज पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. ही बस पुण्याहून मुंबईला जात होती. अपघातात बसचा चक्काचूर झाला असून, मृतकांची संख्या वाढण्याची भीती आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्देवी घटनेबद्दव दुःख व्यक्त केले. या अपघातात मृत झालेल्यांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली तर जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
या दुर्घटनेची माहिती मिळताच बोरघाट, खोपोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य हाती घेण्यात आले होते. तसेच, बचाव पथकालाही पाचारण करण्यात आले होते. सर्व गंभीर जखमींना खोपोली येथील नगरपालिकेच्या रुग्णालयात भरती करण्यात आलेले आहे. बसमधील प्रवासी हे गोरेगाव येथील बाजीप्रभू वादक गट (झांज पथक) या संघटनेचे होते, ते पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सार्वजनिक कार्यक्रमासाठी गेले होते. या कार्यक्रमाची त्यांना ऑर्डर मिळाली होती. हा कार्यक्रम संपवून रात्री एक वाजेच्या सुमारास ते गोरेगावकडे परत येत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. अपघात झाला त्यावेळी सर्व मुले-मुली हे गाढ झोपेत होते. या पथकात सहा मुली व इतर मुले, आयोजक यांचा समावेश होता. घटनास्थळी रायगड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या नेतृत्वात हायकर्स ग्रूप, आयआरबी टीम, पोलिस व स्थानिक नागरिक हे बचावकार्य करत होते.
जखमींची नावे अशी – १) नम्रता रघुनाथ गावणूक, वय २९, २) चंद्रकांत महादेव गुडेकर, वय २९ गोरेगाव., ३) तुषार चंद्रकांत गावडे, वय २२ गोरेगाव., ४) हर्ष अर्जुन फाळके, वय १९ गोरेगाव., ५) महेश हिरामण म्हात्रे, वय २० गोरेगाव., ६) लवकुश रंजित कुमार प्रजाती, वय १६ गोरेगाव., ७) आशीष विजय गुरव, वय १९, दहिसर., ८) सनी ओमप्रकाश राघव, वय २१- खालची खोपोली., ९) यश अनंत सकपाळ, वय १९- गोरेगाव., १०) वृषभ रवींद्र थोरवे, वय १४-गोरेगाव., ११) शुभम सुभाष गुडेकर, गोरेगाव., १२) जयेश तुकाराम नरळकर, वय २४ कांदिवली., १३) विशाल अशोक विश्वकर्मा, वय २३ कांदिवली., १४) रुचिका सुनील धूमणे, वय १७ गोरेगाव.,
१५) ओम मनीष कदम, वय १८ गोरेगाव., १६) युसूफ उनेर खान, वय १४ गोरेगाव., १७) अभिजित दत्तात्रय जोशी, वय २० रत्नागिरी, १८) कोमल बाळकृष्ण चिले, वय १५ मुंबई., १९) हर्ष वीरेंद्र दुरी, वय २० कांदिवली., २०) ओमकार जितेंद्र पवार, वय २४ खोपोली, सोमजाई वाडी , २१) दीपक विश्वकर्मा, वय २१ कांदिवली., २२) हर्षदा परदेशी, २३) वीर मांडवकर, २४) मोहक दिलीप सालप, वय १८ मुंबई.
लोणावळ्याजवळ बोरघाट परिसरातील शिंगरोबा मंदिराजवळ ही दुर्घटना घडली. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ही बस साईड बॅरियर तोडून सुमारे 500 फूट खोल दरीत कोसळली. त्यामुळे बसचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे. ही बस पुण्यावरून मुंबईला निघाली होती. पहाटे 4ची वेळ होती. सर्वच प्रवासी गाढ झोपेत होते. अचानक धडाम धडाम धडाम असा आवाज झाला. काळोखात काहीच दिसत नव्हतं. जे जिवंत होते त्यांना आपण कुठे आहोत हेही कळत नव्हतं. अचानक झालेल्या या अपघातामुळे प्रवाशांनी मदतीसाठी एकच टाहो फोडला. वाचवा वाचवा… कुणी आहे का? असा पुकारा सुरू झाला. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली.