डॉ. आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून राष्ट्र मजबूत केले – नगरसेवक बडे
– बाबासाहेब जन्मालाच आले नसते तर आपण जीवनात सुखी झालो नसतो – सांगळे
नगर (जिल्हा प्रतिनिधी) – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाद्वारे भारताला मजबूत केले. आज संविधानामुळे भारताची लोकशाही प्रबळ तर झालीच पण देशात समताधीष्ठीत समाज रचना निर्माण झाली, असे प्रतिपादन प्रभाग क्रमांक सातचे नगरसेवक तथा शिवसेनेचे महापालिकेतील सभागृह नेते अशोक बडे यांनी केले. तर डॉ. बाबासाहेब जन्माला आले म्हणूनच बहुजन समाजाला आज सुखाने जगता येत आहे. बाबासाहेब नसते तर आपल्या जीवनात कुठलेच सुख नसते, असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक पुरूषोत्तम सांगळे यांनी केले.
शहरातील राजमाता व शिक्षक कॉलेनी येथील साळवे क्लासेसच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती तसेच महात्मा फुले यांची १९६ वी जयंती संयुक्तरित्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक अशोक बडे, नगरसेवक दत्तात्रय सप्रे, भागचंदमामा भाकरे, कॉलेनीचे अध्यक्ष मोहसीन शेख यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना नगरसेवक बडे म्हणाले, की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून सामाजिक सुधारणांचा पाया रचला. उपेक्षित व वंचित वर्गाला त्यांनी हक्क प्राप्त करून दिले. महिला, व उपेक्षित घटकांना त्यांच्यामुळेच न्याय व गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळाली. आज जे सामाजिक परिवर्तन दिसते आहे, ती केवळ बाबासाहेब आंबेडकर यांचीच देण आहे, असे नगरसेवक बडे यांनी सांगितले.
तर ज्येष्ठ संपादक पुरूषोत्तम सांगळे म्हणाले, की राष्ट्रपिता महात्मा फुले यांनी जातीयवाद्यांच्या विरोधात जाऊन सामाजिक परिवर्तनाची चळवळ उभी केली. फुलेंचे शिष्य असलेल्या बाबासाहेबांनी या चळवळीला घटनादत्त अधिकारांचे संरक्षण दिले. महात्मा फुले यांचे स्वप्न बाबासाहेबांनी पूर्ण केले. आज बहुजन समाजाचे जीवन सुखी झालेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले म्हणूनच आपले जीवन सुखी, आनंदी होऊ शकले. बाबासाहेबांच्या उपकराची परतफेड करणे आपल्या कोणत्याही पिढीला शक्य नाही. त्यांच्या विचारांवर चालणे आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करणे, हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरेल, असेही श्री सांगळे यांनी सांगितले.
साळवे क्लासेसच्या संचालिका प्रा. सौ. भारती साळवे व प्रा. संघर्ष साळवे या शिक्षक दाम्पत्याने या छोटेखानी पण बहारदार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. साळवे क्लासेसच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर नृत्ये सादर करून बाबासाहेबांना आपले अनोखे अभिवादन केले. या चिमुकल्यांच्या नृत्यांनी उपस्थित जनसमुदाय भारावून गेला होता. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचलन प्रा. पठाण सर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार बाबा आढाव यांनी मानले. या कार्यक्रमाला संजय उमाप, राजू भिसे, श्री साठे यांच्यासह शिक्षक व राजमाता कॉलेनीतील महिला-पुरूषांसह साळवे क्लासेसच्या विद्यार्थ्यांच्या पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
——————-