बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – भारतरत्न, बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याने या महामानवास अभिवादन करण्यासाठी विविध कार्यक्रमांची रेलचेल केली होती. जिल्हाभरात भीमजयंती हर्षोल्हासात व भव्य मिरवणूक व प्रबोधनांच्या कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी व शासकीय अधिकारीवर्गाने बाबासाहेबांना अभिवादन करून आपली आदरांजली अर्पण केली.
जिल्ह्यात विविध ठिकाणी भारतरत्न ड़ॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमीत्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. बुलढाणा, खामगाव, मेहकर, चिखली, सिंदखेडराजा, देऊळगावराजा यांसह प्रमुख शहरांत तसेच ग्रामीण भागात भीमजयंतीचा वेगळाच माहोल व उल्हास पाहायला मिळाला. काही ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीपासूनच विविध सांस्कृतिक तसेच प्रबोधनात्मक कार्यक्रम सुरू होते. चिखली येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी अशोक वाटिका येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून बाबासाहेबांना अभिवादन केले. यावेळी बाबासाहेबांचा जोरदार जयघोष करण्यात आला.
मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा येथेही विविध संस्थांच्यावतीने आज सकाळी महामानवाला अभिवादन करण्यात आले. येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच संदीप अल्हाट होते. यावेळी ड़ॉ. हेमराज राठी, रणजीत देशमुख, सुधाकर गायकवाड, मुख्याध्यापक राऊत यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी पोलीस पाटील गजानन पाचपोर, जेष्ठ पत्रकार बाळू वानखेडे आदिंनी विचार व्यक्त केले. यावेळी पुस्तके वाटप करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयातसुध्दा महामानवाला अभिवादन करण्यात आले. परिसरातील ड़ॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला सरपंच संदीप अल्हाट, महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला रणजीत देशमुख, स्व. आनंदरावबापू देशमुख यांच्या पुतळयाला रमेश पवार, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला बाळू वानखेडे तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे तैलचित्राला ग्रामविकास अधिकारी शेळके आदींनी माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी गजानन अल्हाट, रमेश बाजड़, बुंधे, नितीन अल्हाट, भिकाजी गायकवाड, मनोज पवार, कृष्णा चव्हाण यांच्यासह गावकरी हजर होते. सिध्दार्थ बुध्द विहार येथे आत्माराम वानखडे यांनी ध्वजारोहण केले. यावेळी उपासक, उपासिका उपस्थित होते. स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्र येथेही महामानवाला अभिवादन करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. परिहार यांच्यासह कर्मचारी हजर होते.
चिखली तालुक्यातील आदर्शगाव मिसाळवाडी येथेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मिसाळवाडीचे सरपंच बाळू पाटील, उपसरपंच हनुमान मिसाळ यांच्यासह गावातील प्रमुख मान्यवरांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन केले. ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा येथेही बाबासाहेबांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.