BULDHANAVidharbha

साखरखेर्डा पोलिसांचा ‘मीडिया मॉनीटर सेल’ ठेवणार सोशल मीडियावर नजर!

सिंदखेडराजा (सचिन खंडारे) – एकमेकांशी संवाद साधण्यासाठी सोशल मीडिया हे प्रभावी साधन आहे. व्हाटसअप ग्रूपच्या माध्यमातून अनेकजण एकमेकांच्या संपर्कात राहतात. मात्र काही समाजकंटक आक्षेपार्ह पोस्ट टाकून किंवा शेअर करून सामाजिक सलोखा धोक्यात आणतात. अशा समाजकंटकांना वठणीवर आणण्यासाठी व सोशल मीडियावर नजर ठेवण्यासाठी साखरखेर्डा पोलिसांनी मीडिया मॉनीटर सेल निर्माण केला आहे. कुणी आक्षेपार्ह पोस्ट किंवा मजकूर टाकली अथवा शेअर केली तर पोलिस स्वतः फिर्यादी होऊन गुन्हे दाखल करणार आहेत.

ठाणेदार नंदकिशोर काळे.

सोशल मीडियावर गावखेड्यातील चांगले लोक एकत्र येऊन, किंवा विविध राजकीय पक्ष, संघटना आपले ग्रूप बनवत असतात. या ग्रुपचा चांगला उपयोग होणे अपेक्षित असते. परंतु अनेक वादग्रस्त पोस्ट या ग्रूपवर टाकल्या जातात व त्यामुळेच दोन समाजामध्ये तेढ निर्माण होण्याचे प्रकारसुद्धा अनेकदा घडले आहेत. त्यामुळे असे प्रकार टाळण्यासाठी बुलढाणा जिल्हास्तरावर व स्थानिक पोलीस स्टेशन अंतर्गत सोशल मीडियावर आता वादग्रस्त पोस्ट टाकणार्‍या विरुद्ध कठोर पावले उचलली जात असून स्थानिक पोलीस स्टेशन स्तरावर आता व्हाट्सअप ग्रूपवर नजर ठेवण्यासाठी मीडिया मॉनिटरसेल स्थापन करण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रत्येक व्हाट्सअप ग्रूपवर बारकाईने लक्ष ठेवणे सुरू असून, कोणताही अनुचित प्रकार दिसल्यास किंवा वादग्रस्त व्हाट्सअप पोस्ट दिसल्यास स्वतः पोलीस कर्मचारी फिर्यादी होऊन वादग्रस्त पोस्ट टाकणार्‍याविरुद्ध फिर्याद दाखल करून आता त्यावर कारवाई करणार आहेत. त्यामुळे व्हाट्सअप ग्रूप वापरताना काळजी घ्यावी लागणार असून, चांगल्या सामाजिक पोस्ट शेअर कराव्या, असे आवाहन साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार नंदकिशोर काळे यांनी केले आहे.

साखरखेर्डा पोलीस स्टेशनमध्ये मीडिया मॉनिटर सेल स्थापन करण्यात आला असून, यामध्ये ठाणेदार नंदकिशोर काळे, दुय्यम ठाणेदार मुंडे, राजे जाधव, नामदेव काळे, भागवत धूड या पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!