BULDHANAChikhaliHead linesVidharbha

‘आरटीजीएस’ने पैसे पाठवतो अशी हुल देवून शेतमालाची खरेदी; गाडेबंधू दिवाळखोरीच्या तयारीत!

– थापाबाज गाड़ेबंधूंची संपत्ती जप्त करून शेतमालाचे पैसे द्या; रविकांत तुपकरांची जिल्हाधिकार्‍यांकड़े मागणी

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – आरटीजीएसने पैसे पाठवतो अशी हुल देवून चिखली तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांचा शेतमाल खरेदी केला व पैसे न देता फरार झालेल्या चिखलीतील व्यापारी गाड़ेबंधूची संपत्ती जप्त करून शेतकर्‍यांची देणी द्यावी व थापाबाज गाड़ेबंधूंवर कड़क कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. दरम्यान, या गाडेबंधूंनी आपणास दिवाळखोर घोषित करावे, आपण शेतमाल खरेदीपोटीचे १० कोटी देऊ शकत नाही, अशी विनंती न्यायालयात केली असून, ते प्रकरण लवकरच सुनावणीस येणार आहे. गाडेबंधूंना दिवाळखोर घोषित केले गेले तर शेतकर्‍यांचे कोट्यवधी रूपये बुडणार असल्याने शेतकरी धास्तावलेले आहेत.

जिल्हाधिकारी ड़ॉ.तुम्मोड़ यांना ११ एप्रिलरोजी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, चिखली तालुक्यातील शेतकर्‍यांनी आपला शेतमाल चिखलीतील व्यापारी संतोष गाड़े व त्यांचे बंधू यांना विकला होता. पैसे आरटीजीएस करतो तसेच काही दिवसांनी देतो, अशी आस दाखवून पैसे मात्र दिलेले नाहीत व पैसे थकवून ते फरार झाल्याचे सांगण्यात येते. यासंदर्भात शेतकरी आता मोठ्या प्रमाणात तक्रारी करीत आहेत. दिवसेंदिवस व्यापार्‍यांचे शेतकर्‍यांना फसविण्याचे प्रकार वाढले आहेत. दरवर्षी पाच ते सहा व्यापारी शेतकर्‍यांना कोटींचा गंड़ा घालून फरार होत असल्याचे प्रकार आमच्यासमोर येत आहेत. यामुळे शेतकर्‍यांचे मात्र मोठे नुकसान होत आहे. आता शेतकर्‍यांना विकलेल्या शेतमालाचे पैसे आरटीजीएसने देण्याऐवजी रोखीने देण्याची व्यवस्था करावी, म्हणजे फसवणूक होणार नाही. तरी शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍या गाड़ेबंधूंची खाजगी संपत्ती जप्त करून शेतमालाचे पैसे द्यावे व त्यांचेवर कड़क कारवाई करावी, अशी मागणीही रविकांत तुपकर यांनी केली आहे.


‘दिवाळखोर’ घोषित होण्यासाठी गाडेबंधू जिल्हा न्यायालयात

फरार असलेल्या चिखलीतील रहिवासी गाडेबंधूंनी चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या वीस वर्षांपासून व्यवसाय केलेला आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांचा त्यांच्यावर विश्वास होता. परंतु, गेल्या ७ एप्रिलपासून त्यांनी शेतमाल खरेदीचा पैसा देण्यास टाळाटाळ चालवली. तसेच, जिल्हा न्यायालयात धाव घेऊन आपणास नादर म्हणजे कायदेशीर दिवाळखोर घोषित करावे, अशी विनंती न्यायालयास केली आहे. तसेच, आपणाकडे १० कोटींची देणी असून, आपण ती फेडू शकत नाही, असेही त्यांनी न्यायालयास कळवले आहे. त्याबाबत न्यायालयाने जाहीर नोटीस प्रकाशित करताच तब्बल २५० शेतकर्‍यांनी लेखी स्वरुपात हरकती दाखल केल्या आहेत. यामध्ये चिखली तालुक्यातील मकरध्वज खंडाळा, सातगाव भुसारी, गांगलगाव, सोमठाणा, गजरखेड, कोनड, शेळगाव आटोळ, मुरादपूर, हातनी, अंबाशी, गिरोला, डौलखेडा, साखळी, एकलारा, मंगरूळ, पळसखेड, मिसाळवाडी, तेल्हारा, पिंपळगाव सराई, ईसरूळ, लव्हाळा, सावरखेड नागरे आदींसह गावांतील शेतकर्‍यांचा समावेश आहे.
—————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!