खामगाव (तालुका प्रतिनिधी) – मामा-भाचीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना खामगाव येथे उघडकीस आली आहे. अवघ्या १० वर्षीय चिमुकलीवर ४० वर्षीय वासनांध मामाने घृणास्पद लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पुणे येथे कामाला असलेला एक ४० वर्षीय युवक खामगाव येथे बहिणीकडे आला होता. दरम्यान, ८ एप्रिलच्या रात्री त्याने आपल्या १० वर्षीय भाचीला तोंड दाबून बाजूच्या खोलीत उचलनू नेले व तिच्यावर बळजबरीने अमानुष लैंगिक अत्याचार केला. हे दृष्कृत्य केल्यानंतर तो पळून गेला. ही घटना पीडित मुलीने तिच्या आईला सांगितली. याबाबत मुलीच्या आईने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, खामगाव पोलिसांनी याप्रकरणी नराधम मामाविरुध्द कलम ३७६ (ए), ३७७, ३७६ (आय) सहकलम ४, ६, ८ पोक्सो अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला. काल रात्री शहर पोलिसांच्या डिबी पथकाने पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या नराधम आरोपीस अकोला बायपास येथून अटक केली आहे. या घटनेने खामगाव शहरात एकच खळबळ उडालेली आहे.
——————