Breaking newsBULDHANAHead linesVidharbha

शेतकर्‍यांनो, घाबरू नका, यंदा भरपूर पाऊस!

– यंदा ८ जूनलाच मान्सूनचे आगमन; २७, २८ जूनला पेरण्या करा!

मेहकर (रवींद्र सुरूशे) – ‘स्कायमेट’ व हवामान खात्याने यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस असल्याचा अंदाज वर्तविल्याने काळजीत पडलेल्या शेतकर्‍यांना प्रसिद्ध हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख यांनी दिलासा देणारा अंदाज व्यक्त केला आहे. शेतकर्‍यांनी काहीही काळजी करू नये, यंदा भरपूर पाऊस आहे. ८ जूनलाच मान्सूनचे आगमन होणार असून, २७, २८ जूनला पेरण्या होतील, तसेच कमी वेळात धरणे भरणार आहेत, अशी गोड बातमीही डख यांनी दिली. देऊळगाव माळी येथील शिव-सावता मित्रमंडळाच्यावतीने महापुरूषांच्या जयंतीनिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी डख यांनी शेतकर्‍यांसह उपस्थितांना मार्गदर्शन केले.

आजच्या जमान्यात जयंती, पुण्यतिथी साजरी करायची म्हणजे मौज, मस्ती आणि मजा, पण मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथील शिव-सावता मित्र मंडळ यांनी महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या गुरु-शिष्यांच्या जयंतीनिमित्त समाज उपयोगी विविध कार्यक्रम राबवून जयंती साजरी केली. दिनांक ११ एप्रिलला ज्यांना शेतकर्‍यांचे कैवारी, ज्यांच्या पुढे हवामान खातेही फेल आहे असे हवामान अभ्यासक पंजाबराव डख पाटील यांचे भव्य असे मार्गदर्शन व शेतकरी मेळावा श्री विठ्ठल रुक्मिणी मंगल कार्यालय येथे संपन्न झाला. या वेळी कृषीयोद्धा संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खरात पाटील, यांचेसुद्धा शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांवर मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शासकीय कंत्राटदार सचिन मगर यांची उपस्थिती लाभली. तसेच पांडुरंग संस्थानचे अध्यक्ष बाबुराव बळी, टी. एल. मगर, बळीनाथ गिरी महाराज, कुंडलिक मगर, माजी सरपंच सुभाष मगर व आदी गणमान्य मंडळी यांची प्रमुख उपस्थिती होती. मार्गदर्शन मेळाव्यामध्ये ज्ञानेश्वर खरात यांनी सरकारचे धोरण आणि शेतकर्‍याचे मरण या विषयावर सविस्तर संवादात्मक मार्गदर्शन केले.

हवामान अभ्यासक पंजाबराव डख पाटील यांनी विविध संकेताद्वारे निसर्ग आपल्या कसा संवाद साधतो, याचे उदाहरण देऊन शास्त्रीय कारण सांगितले. तसेच पुढील १४ एप्रिल ते १६ एप्रिल व १८ एप्रिल ते २२ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात पुन्हा पावसाचे आगमन होणार आहे, असा अंदाजसुद्धा यावेळी वर्तवला. ८ जूनला महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होईल व पेरण्या ह्या २६ जूनपर्यंत होतील व २०२३ मध्ये पाऊससुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असेल, असा अंदाज यावेळी त्यांनी वर्तवला. तसेच निसर्ग वेळोवेळी आपल्यासोबत कशा प्रकारे संवाद साधत असतो याचे उदाहरण दिले. मी शेतकर्‍यांचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होऊ देणार नाही, अशा प्रकारची ग्वाही यावेळी डख पाटील यांनी दिली. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन पत्रकार राजेश मगर यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिव-सावता मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली. असा हा समाज उपयोगी व बळीराजांना मार्गदर्शन असा कार्यक्रम आयोजित करून तरुण युवकांनी याचा बोध घ्यावा. व्यर्थ खर्च न करता आपण जर असे कार्यक्रम राबविले तर आपोआपच उन्नती होईल व महापुरुषांचे विचार आपल्या मस्तकात उतरतील, असा बोध या मंडळींनी दिला आहे. यावेळी परिसरातील जवळपास आठ ते नऊ गावांमधून शेतकरी बांधव बहुसंख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.


हवामान अभ्यासक पंजाबराव डख म्हणाले, शेतकर्‍यांनो घाबरु नका, यंदा भरपूर पाऊस! ८ जूनला मान्सूनच आगमन २७,२८ जूनला पेरण्या होतील. कमी वेळेत धरणे भरणार. १३ एप्रिलच्या आत गहू, हरबरा काढून घ्या, २२ एप्रिलपर्यंत पाऊस राहणार. जूनपेक्षा जुलै, व ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, सर्वाधिक पाऊस. २६ ऑक्टोबरला येणार थंडी. २०२३ ला भरभरून पिके येणार, असा दिलासादायक अंदाजही याप्रसंगी पंजाबराव डख यांनी वर्तविला आहे.
————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!