सोलापूर (संदीप येरवडे) – सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत अभियानाचा आंधळा कारभार सुरू आहे. स्वच्छ भारत अभियानासाठी कोट्यवधी रुपये दरवर्षी शासनाकडून जिल्ह्याला येत असतील तर हा पैसा जातो कुठे? तो पैसा खर्च केला कुठे याचा काहीच मेळ लागत नसल्यामुळे विभागाचे कामकाज सध्या संशयाच्या भोवर्यात सापडले आहे.
विशेष म्हणजे, स्वच्छ भारत अभियानाच्या विभागाची जबाबदारी इशाधिन शेळकंदे यांच्याकडे असले तरी प्रत्यक्षात मात्र जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव हेच पाहत आहेत. त्यामुळे नेमके विभाग प्रमुख कोण आहेत आणि कारभार कंत्राटी कर्मचारी पहात असतील तर विभागाला न्याय मिळू शकेल का? याबाबत सध्या जिल्हा परिषदेच्या आवारात चर्चा सुरू आहे. ग्रामीण भागातील नागरिकाचे आरोग्य चांगले रहावे यासाठी राज्यासह देशातील पंतप्रधानांनी स्वतः स्वच्छ भारत अभियान हाती घेतले आहे. परंतु सोलापूर जिल्ह्यातील स्वच्छ भारत अभियान विभागाला गांभीर्य नसल्याचे दिसत आहे.
स्वच्छ भारत अभियानासाठी लागणारा निधी दरवर्षी येत असेल तर हा निधी जातो कुठे? प्रत्यक्षात काम होते का? प्रचार प्रसिद्धीच्या नावाखाली केवळ कागदी बिले लाटण्याचा प्रयत्न केला जात तर नाही ना, अशी चर्चा सध्या झेडपीच्या वर्तुळात रंगली आहे. विशेष म्हणजे स्वच्छ भारत अभियानाचे विभाग प्रमुख माहिती देण्यास टाळाटाळ करीत असतील काही तर संशय निर्माण होत आहे. कारण जिल्ह्यातील सर्व कुटुंबांना शौचालय बांधून देण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे, परंतु दरवर्षी येणारा निधी जातो कुठे?
कंत्राटी कर्मचार्यांच्या खांद्यावर स्वच्छ भारतचा डोलारा!
स्वच्छ भारत अभियान विभागाचे विभाग प्रमुख हे उपमुख्य कार्यकारी अधिकारी असले तरी प्रत्यक्षात या विभागाचा कारभार मात्र एका कंत्राटी कर्मचार्यांच्या खांद्यावर देण्यात आला आहे. त्यामुळे हा कंत्राटी कर्मचारी सध्या झेडपीमध्ये प्रतिसीईओ म्हणून काम करीत असल्याचा भास निर्माण झालेला आहे. याकडे झेडपीचे प्रशासन विभाग आणखी किती वर्ष हे सहन करणार आहे, अशी चर्चा सध्या झेडपीमध्ये केली जात आहे.
—————–