सोलापूर (संदीप येरवडे) – सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास ७०० ते ८०० घरकुल लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करून हे लाभार्थी घरकुलाचे बांधकाम केलेले नाहीत. त्यामुळे अशा अर्धवट घरकुल बांधकाम करणार्या लाभार्थ्यावर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा आदेश जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी काढला आहे. मागील दोन वर्षापूर्वी ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले होते. परंतु हे लाभार्थी शासनाकडून एक दोन हप्त्याची रक्कम घेतली. परंतु पुढे घरकुल बांधलेच नाही. त्यामुळे अर्धवट बांधकाम करणार्या लाभार्थ्यांनी त्वरित घरकुलाचे काम पूर्ण करावे, असे आदेशात नमूद आहे.
दरम्यान, केंद्रपुरस्कृत व राज्य पुरस्कृत घरकुलांच्या सद्यस्थितीबाबतचा आढावा मंगळवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सोलापूर येथील सभागृहामध्ये घेतला. सद्यस्थितीत राज्यस्तरावर घरकूलाचा जो आढावा घेतला जातो त्यात प्रामुख्याने केंद्र शासनाचा महत्वाचा व घरापासून वंचित कुटूंबांना प्रथम प्राधान्याने घरकुलाचा लाभ देणारी प्रधान मंत्री आवास योजना व राज्य शासनाची राज्य पुरस्कृत आवास योजना असून त्या दोन योजना राबविताना सोलापूर जिल्याचे उद्दीष्ट हे पुणे विभागात सर्वात जास्त ४९ हजार ६०२ इतके आहे. त्यापैकी ३२ हजार ९०५ इतके घरकूले पूर्ण असून त्याची टक्केवारी ६६.३४. इतकी आहे. परंतु लाभाची जागा उपलब्ध नसल्याने ५ हजार ६५६ इतके लाभार्थी भूमीहीन आहेत. ही लाभार्थ्यांची संख्या महाराष्ट्रात इतर जिल्हयाच्या तुलनेत जास्त आहे. त्यासाठी सोलापूर जिल्हयाचा महाराष्ट्राच्या एकंदर आढाव्यात स्थान खाली घसरले आहे.
यासाठी सर्वच तालुक्यानी एकतर त्या लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन द्यावयाची अन्यथा घरकुल रद्द करावे लागते. यामुळे पुढे मिळणारे प्रधानमंत्री आवास योजनेचे उद्दीष्ट आपल्या जिल्हयाला मिळणार नाही याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, घरकुल विभागाचे कर्मचारी, सर्व ग्रामीण गृहनिर्माण अभियंते यांना याबाबत सविस्तर सूचना दिल्या. याबाबत त्यांनी सर्वांनी लोकजागृती करावी, सरपंचाना याबाबत मार्गदर्शन करावे व गावात ग्रामसभेव्दारे तातडीने ठराव पारीत करण्याबाबत ग्रामसेवकाना सक्त सूचना दिल्या.
या बैठकी प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन / ग्रामपंचायत) इशाधिन शेळकंदे, प्रकल्प संचालक १ उमेशचंद्र कुलकर्णी तसेच ११ तालुक्याचे गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक, घरकूल विभागाचे काम पाहणारे सर्व तालुक्यातील वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, डाटा एन्ट्री ऑपरेटर ग्रामीण गृहनिर्माण अभियंते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.