– ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान असेल तरच मदत मिळणार; दोन हेक्टरच्या क्षेत्राची मर्यादा!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – जिल्ह्यासह राज्यात अवकाळी पावसाने शेतीपिकांचे, तसेच घरांची पडझड जीवित्वाचे मोठे नुकसान केले आहे. या नुकसानग्रस्त शेतकर्यांना सरसकट मदत न देता राज्य सरकारने तोकडी मदत करून तोंडाला पाने पुसली आहेत. माहे मार्चमध्ये झालेल्या नुकसानीपोटी २३ जिल्ह्यांसाठी १७७ कोटी मंजूर करण्यात आले असून, त्यात बुलढाणा जिल्ह्यासाठी आठ कोटी रूपये मिळाले आहेत. म्हणजे हेक्टरी 13 हजार 600 रूपये मदत मिळणार आहे. सदर मदत दोन हेक्टरपर्यंतच मिळणार असून, यासाठी ३३ टक्के नुकसान गरजेचे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत.
गेल्या मार्च महिन्यात राज्यात जवळजवळ २३ जिल्ह्यात गारासह तुफान अवकाळी पाऊस पड़ला. बुलढाणा जिल्हाही या अवकाळीच्या कचाट्यातून सुटला नाही. यामध्ये रब्बीसह फळबागा, कांदासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले तर काही भागात जीवितहानीसुध्दा झाली. नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला असताना व मदतीची आस धरून असताना राज्य सरकारने अटी व शर्ती घालून तुटपुंजी मदत देण्याचे धोरण स्वीकारले आहे. मदतीची रक्कम जिल्ह्यानिहाय वितरीत करण्याबाबतचा शासन निर्णय १० एप्रिलरोजी जारी करण्यात आला. यामध्ये ४ ते ८ मार्च व १६ ते १९ मार्च दरम्यान पड़लेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची मदत देण्यात येणार आहे. यामध्ये राज्यातील नुकसानग्रस्त २३ जिल्ह्यांसाठी १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रूपये मंजूर झाले आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील आठ हजार शेतकर्यांच्या ४८२३ हेक्टर बाधीत क्षेत्रासाठी ७ कोटी ९२ लाख मिळाले आहे. वास्तविक पाहाता, यापेक्षा जास्त शेतकर्यांचे नुकसान झालेले असून, त्या नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या तोंडाला सरकारने पाने पुसली आहेत. राज्यातील सव्वादोन लाख शेतकर्यांना नुकसानीपोटी १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रूपये मिळणार असून, सदर रक्कम जिल्हानिहाय वितरीत करण्याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. सदर नुकसानीची मदत ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्यांनाच मिळणार असल्याने व दोन हेक्टरपर्यंतच देण्यात येणार असल्याने इतर हजारो शेतकरी आपला तीव्र संताप व्यक्त करत आहेत.