बुलढाणा जिल्ह्यात ७७ ग्रामपंचायतची पोटनिवडणूक; ८ सरपंच थेट जनता निवडणार!
बुलढाणा (संजय निकाळजे) – राज्यात ३ हजार ६६६ ग्रामपंचायत सदस्य आणि १२६ सरपंच पदासाठी पोट निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील ७७ ग्रामपंचायतीमधील ९६ सदस्य व आठ सरपंच पदाचा समावेश आहे.
विविध कारणाने रिक्त झालेल्या तर काही अपात्र झाल्याने ही पोट निवडणूक घेण्यात येणार असून, १८ मे रोजी मतदान होणार आहे. या पोटनिवडणीसाठी २५ एप्रिल ते दोन मेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. तीन मे रोजी अर्जाची छाननी होणार असून, आठ मे रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. दुपारी तीन वाजेनंतर उमेदवारांना चिन्हाचे वाटप होणार असून, १८ मे रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर लगेच दुसर्या दिवशी म्हणजे १९ मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. तसेच या निवडणुकीत आठ सरपंचाची थेट जनतेमधून निवडणूक घेण्यात येणार आहे. ही निवडणूक काहींची निधन राजीनामा वेगवेगळ्या कारणामुळे रिक्त झालेल्या जागेची होणार आहे.
कार्यकाळ पूर्ण होण्यास सहा महिन्याचा कालावधी शिल्लक असलेल्या ग्रामपंचायतीमधील पद रिक्त असल्यास त्यासाठी त्या ठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात येणार नाही. त्यामुळे अशा ग्रामपंचायतीमधील पद रिक्तच राहणार आहे. असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. ग्रामीण भागात प्रतिष्ठेची आणि महत्त्वाची समजली जाणारी ग्रामपंचायत निवडणूक असते. आता रिक्त असलेल्या पदांसाठी निवडणूक होत असून, कित्येक दिवसापासून गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या उमेदवारांचा माहोल त्या निमित्ताने बघावयास मिळणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठी घेणे सुरू केले आहे. तर अनेकजण गाव कारभारी होण्यासाठी इच्छुक असून, त्यांनी तशी फिल्डिंग लावणे सुरू केले आहे.