छत्रपती संभाजीनगर /बुलढाणा (खास प्रतिनिधी) – दर दहा वर्षांनी होणार्या जनगणनेतून उपेक्षित समाजाची स्थिती तापासून त्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न दरवर्षीच्या अर्थसंकल्पातून केला जातो. परंतु, देश स्वातंत्र्य झाल्यापासून आजतागायत जातीनिहाय जनगणना झाली नसल्याने प्रत्येक नागरिकांच्या मूलभूत अधिकरांसाठी जातीनिहाय जनगणना होणे गरजेचे असल्याचे मत प्रा. डॉ. सूरज मंडल यांनी व्यक्त केले.
रेड वेलवेट रेस्टॉरंट, छत्रपती संभाजीनगर येथे रविवारी ९ एप्रिल रोजी आयोजित ओबीसी चिंतन शिबिर व माहिती पुस्तिका आणि वेबसाईट प्रकाशन सोहळ्यात उदघाटक म्हणून ओबीसींचे भविष्यातील आंदोलन कसे असावे? या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाचे संस्थापक अध्यक्ष सुनील शेळके होते. तर मुख्य वक्ता म्हणून सत्यशोधक शिक्षक सभेचे सचिव, डॉ.प्रभाकर गायकवाड उपस्थित होते. पुढे बोलताना मंडल म्हणाले की, सत्ता आणि प्रशासनामध्ये ओबीसींना योग्य वाटा नाही. मंडल आयोगाने केलेल्या ४० पैकी फक्त २ शिफारशी मान्य करण्यात आल्या.केंद्र सरकारच्या अपर सचिवांमध्ये एकही ओबीसी नाही, सुप्रीम कोर्टामध्येही तीच परिस्थिती आहे.आरक्षणाची अंमलबजावणी होण्यासह पदोन्नतीमध्ये ओबीसींना आरक्षण देण्यात यावे तसेच भारतात ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केली. कार्यक्रमाचे संचालन डॉ.शिवशंकर गोरे यांनी केले तर आभार संजय खांडवे यांनी मांनले. चिंतन शिबिराच्या यशस्वीतेसाठी किशोर पवार, गजानन हुडेकर ,महादेव मिरगे, प्रभाकर चौधरी, संतोष ताठे,संजय देवर, निवृत्ती तांगडे , अनिल हिस्सल , गजानन पडोळ यांनी परिश्रम घेतले.
मंडल यांच्याकडून संकेतस्थळाचे कौतुक
ओबीसी चिंतन शिबिरात ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाचे संकेतस्थळ व माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. दीपक पाटील यांनी डिझाईन केलेल्या संकेतस्थळाबद्दल संघाचे राज्य महासचिव राम वाडीभष्मे यांनी सविस्तर माहिती देऊन सदस्य नोंदणीसाठी आवाहन केले. तद्नंतर प्रा.डॉ. सुरज मंडल यांनी ओबीसी समाजाच्या तसेच विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी असलेल्या या संकेतस्थळाचे कौतुक करून देशपातळीवरील ओबीसी घटकांनाही सामावून घेण्याचे मार्गदर्शन केले.
वर्गीय चेतना महत्वाची – सुनील शेळके
ओबीसींनी स्वतःची ओळख ओबीसी म्हणून न देणे हे खेदजनक आहे. जातीय चेतना वघळून वर्गीय चेतना निर्माण करण्यासह ओबीसींच्या हक्क अधिकार व आरक्षणासाठी ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ कार्यरत राहणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष सुनील शेळके म्हणाले. आपण तंत्रज्ञानाकडे दुर्लक्ष केले होते मात्र आता काळानुसार चळवळीची शस्त्रे बदलणे आवश्यक आहे. ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळ नॉलेज सेंटर म्हणून काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ओबीसी संघ मैलाचा दगड ठरावा – डॉ.प्रभाकर गायकवाड
ओबीसी समाजासमोर आव्हानांचा डोंगर आहे. ओबीसी मतदार म्हणून जागृत नाही, आता कुठे आम्ही संघटित होत असताना रोहिणी आयोगाचा घाट घालण्यात आल्याचे प्रभाकर गायकवाड यांनी सांगून, ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा जागृतीची लाट निर्माण झाल्यास राष्ट्रनिर्माणाच्या दृष्टिकोनातून ओबीसी संघ मैलाचा दगड ठरावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शिक्षा अधिकार कायदा असताना मुले शाळा बाह्य कशी हा प्रश्न उपस्थित करत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवणारे असल्याचा आरोप डॉ. गायकवाड यांनी केला. देशात वर्ग एक ते वर्ग चार शासकीय आणि निमशासकीय क्षेत्रातील ओबीसींच्या अनुशेष ९६ लाख पदांचा असल्याचेही ते म्हणाले.
—————