दिशाहीन माणसाला दिशा दाखवण्याचे काम गडांनी केले, परमार्थिक परंपरा चार-चार पिढ्या टिकून राहणे ही तर संत वामनभाऊंची कृपा – चैतन्यमहाराज देगलूरकर
शेवगाव, जि.नगर (बाळासाहेब खेडकर) – भरकटलेल्या आणि दिशाहीन माणसाला दिशा दाखवण्याचे काम गडांनी चालू ठेवले आहे, परमार्थिक परंपरा चार चार पिढ्या टिकून राहणे ही तर संत वामनभाऊंची कृपा असल्याचे प्रतिपादन ज्ञानसिंधू चैतन्यमहाराज देगलूरकर यांनी केले. ते मानूर येथे रविवारी सायंकाळी संत वामनभाऊंनी प्रारंभ केलेल्या ९१ व्या नारळी सप्ताहात कीर्तन प्रसंगातून बोलत होते.
महंत विठ्ठल महाराज यांच्या अध्यक्षतेखाली हजारो भाविकांच्या उपस्थितीत नारळी सप्ताह सुरू आहे, मानूरकर आपले सर्वस्व पणाला लावून सप्ताहासाठी झटत आहेत. ‘आता तुम्ही कृपावंतस् साधु संत जीवलग’ या अभंगावर विवेचन करतांना एक एक वाक्य तुकोनी घेतले मोती जैसे अशा स्वरूपाचे होते, आता हा शब्द कधी वापरला जातो, गोमटे म्हणजे काय हे सांगून संताशिवाय दुसरी कुणाची ताकद नसल्याचे सांगितले. संतांची वचने ही समुद्राहून खोल अर्थभरीत असतात. सुरू केलेला उत्सव टिकून ठेवणे तेवढे सोपे नाही. ३१ डिसेंबरच्या प्रतिज्ञा सोप्या असतात, परमार्थिक परंपरा चार चार पिढ्या टिकून राहणे ही तर भाऊंची कृपा, त्यावेळी परमार्थ करण्याला जमीन सुपीक होती आज ती दिसत नाही, तहान शमवण्याची ताकद गडाची, गीता ही द्राक्षाची वेल आहे, दिशाहीन माणसाला दीपस्तंभ बनून दिशा देण्याचे काम गडांनी केले. संतांशिवाय गोमटे करण्याची दुसरी कुणाची ताकद नाही, संतांची वचने समुद्राहून खोल अर्थभरीत असतात, तुकोबांच्या अभंगातून नेमका अर्थ ते सोडून कुणाला सांगता येणार नाही, ज्ञानेश्वरीचा अर्थ ज्ञानेश्वरच जाणतात, सूत्रग्रंथाचा प्रारंभ आता या शब्दाने होतो, आता या शब्दाला प्रारंभ, पूर्वभाव, अंती, अंताच्या नंतर वापरले जाते, या तीनही अर्थापेक्षा वेगळा आयाम देतात तुकोबा, प्रपंच जड आहे तो कल्याण करू शकत नाही, जड पदार्थ चांगलाही नसतो आणि तो वाईटही नसतो मात्र तो वापर करणारांवर अवलंबून असतो, संसार निर्माणच झाला नाही तर सुख कसा देईल, पण दुःख मिळाल्याशिवाय राहणार नाही. जीव चेतन आहे म्हणून जिवाला तुकोबा म्हणाले गोमट करा. परंतु, तो कल्याण करू शकत नाही. गोमटेपणाची कल्पना घेऊन देवाकडे गेले तुकोबा, तो देवदेखील कल्याण करू शकत नाही, आपण सज्जनही नाही आणि दुर्जन नाही, सज्जन म्हणून घेण्याचे धाडस नाही आणि दुर्जन म्हणायची लाज वाटते म्हणून देवाला आपला पत्ताच माहित नाही, देव सज्जनासाठी येतो किंवा दुर्जनासाठी येतो, चेतन, परिपूर्ण आणि जगाच्या कल्याणाची तळमळ असणारे फक्त संत, सगळीकडे निराशा होत असल्याची खात्री झाल्यानंतर एक जागा शिल्लक राहते त्यावेळी आता हा शब्द वापरला जातो. असे अनमोल विचार हभप. देगलूरकर यांनी मांडले.
या सोहळ्यात पावसाने एक दिवस व्यत्यय आणला होता. मात्र दुसर्या दिवशी भाविकांची गर्दी उसळली असल्याचे चित्र दिसत होते.
—
विठ्ठल महाराज टाळ घेऊन उभे!
हभप. चैतन्य महाराज देगलुरकर यांचे हरिकीर्तन सुरू असताना महंत विठ्ठल महाराज हे स्वत: गळ्यात टाळ घेऊन टाळकर्यांत उभे होते. ते दृश्य पाहून उपस्थितांनी हात जोडले.
————-