Breaking newsHead linesMaharashtraPolitical NewsPoliticsWorld update

BREAKING NEWS! शरद पवारांना धक्का! राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला!!

– आम आदमी पक्ष बनला आता राष्ट्रीय पक्ष

नवी दिल्ली (आवेश तिवारी) – महाराष्ट्रातील दिग्गज नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने आज जोरदार धक्का दिला आहे. देशभरात सहा टक्क्यांपेक्षा जास्त मतदान प्राप्त करण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवत, निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह तृणमूल काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय) या तीन पक्षांचा राष्ट्रीय पक्षांचा दर्जा काढून घेतला आहे. यापूर्वी आयोगाने मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाचा (बीएसपी) राष्ट्रीय पक्षाचा दर्जाही असाच काढून घेतला होता. तर दुसरीकडे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा मिळाला असून, त्यांच्या आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे. राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी आम आदमी पक्षाने गुजरात व हिमाचल प्रदेश निवडणुकीत सहा टक्क्यांपेक्षा जास्त मते प्राप्त केली होती.

२०१४ नंतरच्या सलग दोन लोकसभा निवडणुका आणि २०१९ नंतर २१ पैकी १२ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी लक्षात घेऊन केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला असल्याचे प्रथमदर्शनी दिसते. राष्ट्रवादी काँग्रेससोबत तृणमूल काँग्रेस, भाकपचाही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला. चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये कमीत कमी सहा टक्के मते असतील किंवा लोकसभेच्या निवडणुकीत तीन किंवा जास्त राज्यामध्ये किमान दोन टक्के मते असतील तर राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला जातो. असा दर्जा मिळाल्यानंतर संपूर्ण देशभरात एकच निवडणूक चिन्ह मिळते. त्याशिवाय, नवी दिल्लीमध्ये पक्षाच्या कार्यालयाला जागा मिळते. निवडणुकीमध्ये दूरदर्शन अथवा इतर सार्वजनिक वाहिन्यावर ब्रॉडकॉस्टिंगसाठी वेळ मिळतो. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानंतर या सर्वासाठी पक्ष अपात्र ठरतात. त्याचा आता शरद पवार यांच्यासह ममता बॅनर्जी यांनाही मोठा फटका बसणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना १९९८ साली झाली होती. तेव्हापासून सलग १५ वर्षे हा पक्ष राज्यात सत्तेत होता. तसेच या पक्षाने देशाच्या राजकारणातही ठसा उमटवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे एकेकाळी देशाचे केंद्रीय कृषिमंत्रीदेखील होते. असे असताना निवडणूक आयोगाने आज या पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केल्याने, मोठी राजकीय खळबळ उडालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आगामी काळातील राजकारण आणि निवडणुकीत याचा मोठा फटका बसणार असून, घड्याळ हे निवडणूक चिन्हही वापरण्याबाबत बंधने येणार आहे. पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढताना लोकसभा २०१९ चे नियम लक्षात घेतले आहेत. त्यानंतर ज्या राज्यात निवडणुका झाल्या आहेत, तेथील आकडेवारी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.


राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत, राज्यपाल मोदींच्या भेटीला!

महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच मोठ्या घडामोडी होण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस हे तडकाफडकी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेले आहेत. राज्यपालांच्या ट्विटर अकाऊंटवरून या भेटीचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. राज्यपालांनी ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात असले तरी, या भेटीमुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण झाली आहे, याचा निकाल आता कधीही लागू शकतो. त्यातच विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल, असा अंदाज वर्तवला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यपालांची नरेंद्र मोदी यांच्यासोबतची भेट महत्वपूर्ण मानली जात आहे.
——————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!