बुलढाणा (प्रतिनिधी) – समोरासमोर लढतीत जिंकू शकत नसल्याने विरोधक अर्ज बाद करण्याचा रडीचा डाव खेळत आहे. अर्ज बाद काय करता? समोरासमोर लढून जिकून दाखवा. विकास कामांच्या बळावर मी निवडणुकीत असो नसो कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती आमचाच असेल, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख (ठाकरे गट) जालिंदर बुधवत यांनी केले.
जनशिक्षण संस्थान येथे आज ७ एप्रिलरोजी पत्रकार परिषदेत त्यांनी भूमिका मांडली. काल निवडणूकपूर्वीच प्रशासनाने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद केला होता. यावेळी बुधवत म्हणाले, की बाजार समितीत डोळ्याने दिसतील अशी कामे केली आहेत. मी उमेदवार नसलो म्हणजे शिवसेनेचा उमेदवार नसेल असे होत नाही. सत्तेच्या बळावर काहींनी अक्षरश: धुडगूस घालणे सुरू केले आहे. रडीचा डाव म्हणता येईल असे हे काम आहे. काही जण दबावतही असतील पण सदसदविवेक बुद्धीचा उपयोग करून निर्णय घ्यायला हवा होता, असे आम्हाला वाटते. माझ्या सोसायटी मतदार संघातील उमेदवारी अर्जासोबतच सहा महिन्यांआधी व्यापारी म्हणून असलेले माझे लायसन रद्द केल्याचा पुरावा सोबत जोडला आहे. त्याबाबत बाजार समितीच्या निवडणूक अधिकार्यांनाही सांगितले आहे. तरीही अर्ज बाद केला गेला. याविरोधात आपण दाद मागणार असल्याचेही बुधवत म्हणाले.
—————-