सोलापूर जिल्ह्यात ‘गुड मॉनिंग’ पथके कागदावरच; हागणदारीमुक्त अभियानाचा फज्जा!
सोलापूर (संदीप येरवडे) – हागणदारी मुक्त अभियानासाठी शासन स्तरावर जनजागृतीसह विविध प्रयत्न जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आले. यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गुड मॉर्निंग पथके तयार करण्यात आली होती. हागणदारी मुक्त जिल्हा झाल्याची घोषणा ५ वर्षांपूर्वी जिल्ह्यात करण्यात आली. त्यासाठीचे फलकही गावोगावी लावण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात हागणदारी मुक्त अभियान यशस्वी झाल्याचे ग्रामीण भागात कुठेही दिसून येत नाही.
हागणदारीमुक्त जिल्हा परंतु प्रशासनाच्या उदासीन धोरण आणि लोकसहभागाअभावी गुड मॉर्निंग पथके केवळ कागदावरच राहीले आहे. मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीमार्फत ग्रामीण भागात कर्मचार्यांच्या मदतीने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गुड मॉर्निंग पथकाची निर्मिती करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाचे सहकार्य नसल्याने गावकर्यांमध्ये तेढ निर्माण होऊ लागला आहे. सुरुवातीला ज्या स्वच्छता अभियानाचा एक भाग म्हणून सकाळी उघड्यावर शौचास जाणार्यांच्या मनात भितीचे वातावरण पसरले होते. ती भीती आता लोकांमध्ये राहिलेली नाही. ग्रामस्थ बिनधास्तपणे उघड्यावर शौचास बसत असल्याचे चित्र गावोगावी दिसते.
गावात प्रवेश करताना किंवा गावातून बाहेर पडताना दुर्गंधी येते, तेंव्हा नाकाला रुमाल बांधण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. पूर्वी पथकाची भिती निर्माण झाल्याने नागरिक शौचालयाचा वापर करीत होते. परंतु आता तशा प्रकारची भिती नागरिकांच्या मनात राहिलेली नाही. त्यामुळे उघड्यावर शौचास जाणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पूर्वीप्रमाणेच गुड मॉर्निंग पथकाकडून अशा व्यक्तींवर कारवाई सुरु करावी, अशी मागणी नागरिकांतून पुढे आलेली आहे. दरम्यान, उघड्यावर शौचालय जाणार्यांची संख्या वाढण्याचे कारणे अनेक आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पाण्याची देखील समस्या आहे. अनेक गावांमध्ये पाणी नसल्यामुळे शौचालय बांधून देखील नागरिकांना उघड्यावर जावे लागत आहे.
स्वच्छता विभागाची भेट कागदोपत्री
स्वच्छता विभागाकडून गावात वेळोवेळी भेटी देऊन स्वच्छता मोहीम राबविणे अपेक्षीत आहे. परंतु स्वच्छता विभागाची भेट कागदोपत्री दाखविली जाते. त्यामुळे या मोहिमेचा कारभार केवळ कार्यालयात बसूनच चालतो का असा प्रश्न उपस्थित होत आहे. ग्रामस्थ उघड्यावर शौचास जात आहेत. त्यामुळे या विभागाला गांभीर्य कधी येणार असा प्रश्न ग्रामीण भागातून उपस्थित होत आहे.
नागरिकांचे आरोग्य धोक्यात
घरोघरी शौचालय बांधण्यात आली आहेत. परंतु बहुतांशी कुटूंबे त्याचा वापर करीत नसल्याची धक्कादायक माहिती आहे. उघड्यावर शौचास जाणार्या नागरिकांचे प्रमाण वाढल्याने सर्वांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी देखील त्या मोहिमेकडे लक्ष देणे अपेक्षित आहे.
गुड मॉर्निंग पथकाची ज्या गावांमध्ये मागणी होते त्या गावांमध्ये हे पथक जाते. सध्या तरी कोणत्या गावांमधून गुड मॉर्निंग पथकाची मागणी करण्यात आलेली नाही. उघड्यावरील शौचालय जाणार्याची संख्या कमी करावे, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
– सचिन जाधव, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक
——————