भिंत कोसळून दोन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
बुलढाण्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने थैमान घातलं. यात संग्रामपूर तालुक्यातील काटेल येथील गणेश बोरकर यांच्या घराची भिंत कोसळून त्याखाली दोन मुली दबल्याची घटना घडली. कृष्णाली आणि राधा असे या मुलींची नावे आहेत. घटनेनंतर गावकऱ्यांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले आणि दोघींना जवळच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. डॉक्टरांनी दोन वर्षीय कृष्णाली हिला तपासून मृत घोषित केलं तर राधावर सध्या उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे
बुलढाणा (गणेश निकम) – कडक उन्हाळा सुरू असताना अधून मधून पावसाचे वातावरण तयार होत आहे. आज दुपारी बुलढाणा शहरात तसेच जिल्ह्यातील काही भागात जोरदार वादळी वार्याचा पावसाने हजेरी लावली. आलेला पाऊस फळपिकांना मारक ठरणार आहे. विशेषतः आंबा पिकाचे यामुळे मोठे नुकसान झाले असून, कांदा व इतर पिकांचेही नुकसान झाले आहे.
आज दुपारी बुलढाणा, मोताळा, देऊळघाट, कोलवड, केळवद या ठिकाणी अवकाळी पावसाचे आगमन झाले. सोसाट्याचा वारा व तुरळक गारपीटही झाली. यासह चिखली, देऊळगावराजा, लोणार, खामगाव, शेगाव, मेहकर या तालुक्यांच्या काही भागातही पावसाने हजेरी लावली. उन्हाळ्यात येणारा पाऊस बळीराजासाठी चिंतेचा विषय ठरतो. बर्याच ठिकाणी गहू काढणे आटोपत आले असल तरी मका, ज्वारी, आंबा, संत्री, मोसंबी, डाळिंब, चिकू, भाजीपाला आदी पिके आहेत. आलेल्या अवकाळी पावसामुळे फळपिकांचे मोठे नुकसान झाले. बर्याच भागात आंबा लगडलेला आहे. वादळी वर व गारपीटही झाल्याने आंब्याचे मोठे नुकसान झाल्याची परिसरात चर्चा आहे. जवळपास अर्धा तास पाऊस बुलढाणा परिसरात बरसला. दरम्यान काही प्रमाणात गारपीटही झाली.
हवामान विभागाकडून राज्यातील काही भागात आगामी तीन– चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यानुसार राज्यातील अनेक भागात हजेरी लावली आहे. दोन दिवसांपासून वातावरणात देखील बदल झाला असून उन्हाची तिव्रता कमी होवून ढगाळ वातावरण झाले आहे. यामुळे हवेत देखील काहीसा गारवा असल्याचे जाणवत आहे.
पावसामुळे भिंत कोसळून गंभीर जखमी झालेल्या 2 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्याच्या काटेल गावात ही घटना घडली. यात आणखी एक मुलगी किरकोळ जखमी झाला आहे. या घटनेनंतर गावावर शोककळा पसरली आहे.
शेतकर्यांची चिंता वाढली
उन्हाळात कडक ऊन तापले तर पावसाळा चांगला राहतो, असे संकेत आहे. उन्हाळ्यात तापले तर पावसाळ्यात बरसते असे म्हणतात. मात्र मार्च महिन्यात यंदा दोन वेळा पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच, अवकाळी पावसासह गारपीटचाही तडाखा बसला आहे. त्यामुळे जोरदार तापत नसल्याने यंदाचा पावसाळा चांगला राहील की नाही, याबाबत शेतकरी साशंक झालेला आहे.
——————