बुलढाणा (बाळू वानखेडे) – शासन म्हणजे मायबाप असे म्हटल्या जाते, ते चुकीचे नाही, हे वेळोवेळी सिद्धही झाले आहे. अनेक गरजुंना विविध योजनांच्या माध्यमातून शासन आधार देत असते. राज्य शासनाच्या बाल संगोपन योजनेच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील जवळपास २२०० निराधार पाल्यांना लाभ मिळाला आहे. यामध्ये एचआयव्ही (एडस), कैदी, कोरोनापीडित व शेतकरी आत्महत्याग्रस्त पाल्यांनाही या योजनेतून मोठा आधार मिळाला आहे.
राज्य शासनाच्या बाल संगोपन योजनेतून अनाथ, निराधार, दुर्धर आजारग्रस्त, इतर निराधार पाल्यांना प्रती महिना ११०० रूपये सानुग्रह अनुदान दिले जाते. सदर अनुदान वर्षातून दोनवेळा म्हणजे सहा महिन्यातून एकदा असे दोन हप्त्यात ६६०० रूपये प्रतिहप्ता असे देण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पालकांचा मृत्यू दाखला, बोनाफाईड़, तलाठी उत्पन्न दाखला, आधारकार्ड़, बँक पासबुक झेरॉक्स, रहिवासी दाखला, फोटो व इतर कागदपत्रे लागतात. गेल्या २०२३-२०२३ या वर्षात जवळपास २२०० विविध कारणांनी निराधार झालेल्या पाल्यांना या योजनेचा फायदा झाला असून, १५०० पाल्यांचे सानुग्रह अनुदान लवकरच मिळणार आहे. यामध्ये दोन वर्षापेक्षा जास्त शिक्षा झालेल्या वैâद्यांचे पाल्य ४०, एचआयव्ही ग्रस्तांचे ३०, कोरोना पीडितांचे ४८३ तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्तांच्या ४३० पाल्यांनाही या योजनेच्या माध्यमातून आधार मिळाला आहे. या योजनेअंतर्गत आता प्रतिमहिना २२०० रूपये सानुग्रह अनुदान देण्याचा शासन निर्णय झाला असून, तो लागू झाल्यानंतर निराधार पाल्यांना मोठा आधार मिळणार आहे. तसेच, या पाल्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक हातभार लागणार आहे.
वेळ व पैसा वाचावा म्हणून तालुकास्तरावर तालुका संरक्षण अधिकारी यांच्याकडे आवश्यक कागदपत्रांसह बाल संगोपन योजनेसाठी अर्ज करण्याची सोय करून देण्यात आली आहे. तरी अनाथ, निराधार, दुर्धर आजारग्रस्त व इतर निराधार पाल्य किंवा त्यांच्या पालकांनी या योजनेचा फायदा घ्यावा.
– रामेश्वर वसु, जिल्हा महिला व बाल विकास, अधिकारी, बुलढाणा
————