– पहिल्या नुकसानीचा छदामही मिळाली नाही, तोच दुसरे संकट!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात आज ७ मार्चरोजी दुपारी जोरदार अवकाळी पाऊस झाला. यामुळे कांदा, टरबूज, टोळकांदा या पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे, तर अवकाळी पावसामुळे याअगोदर झालेल्या नुकसानीची अद्याप छदामही मदत मिळाली नाही, तोच हे दुसरे संकट बळीराजावर कोसळले आहे.
जिल्ह्यात यावर्षी पाऊस सुरूच आहे. पावसाळ्यात पावसाने कहर केल्याने हातची पिके गेली तर आता कड़क उन्हाळ्यातही अवकाळी पाऊस पिच्छा सोड़ायला तयार नाही. गेल्या मार्च जिल्ह्यात विविध भागात तुफान अवकाळी पावसासह गारपीट झाली. यामुळे रब्बी पिकासह फळबागा, कांदा, भाजीपालासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात ओरड़ झाल्यावर नुकसानीची पाहणी करण्यात आली. नुकसानीचे आकड़ेही शासनाकडे गेले पण अद्याप शेतकर्यांना छदामही मदत मिळाली नसल्याची माहिती आहे. आज सात एप्रिल रोजीही खामगाव तालुक्यातील, शिर्ला नेमाने, आंबेटाकळी, बोरी अड़गाव, टेंभूर्णा, अटाळी, गवंढाळा, विहीगाव, आवार, लाखनवाड़ा, पळशी, तसेच शेगाव तालुक्यासह जिल्ह्यात बरेच ठिकाणी विजेच्या कड़कड़ाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे टोळकांदा, कापलेला कांदा, फळबागा, टरबूज, वीटभट्ट्यांचे तसेच इतरही पिकांचे मोठे नुकसान झाले. तरी शासनाने आता कोणतेही निकष न लावता सरसकट मदत द्यावी, अशी रास्त मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करत आहेत.
————–