BULDHANALONAR

सुलतानपूर ग्रामपंचायतीमध्ये अनागोंदी; चौकशीची मागणी, उपोषणाचा इशारा!

बुलढाणा (खास प्रतिनिधी) – लोणार तालुक्यातील सुलतानपूर ग्रामपंचायतमधील अनागोंदी कार्यभाराला आळा बसवून दोषीवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सुलतानपूर ग्रामपंचायत सदस्य तथा गावकर्‍यांनी ५ एप्रिल रोजी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे. सदर निवेदनात तक्रारींचा पाढा वाचण्यात आला आहे.

सुलतानपुर ग्रामपंचायत सरपंचपती यांचा ग्रामपंचायतमधील हस्तक्षेप थांबवून नियमानुसार कारवाई करण्यात यावी, ग्रामपंचायतचे ठराव रजिस्टर व ग्रामपंचायतचे सर्व दाखले सह्यासाठी सरपंच यांच्या घरी नेणे थांबवून सर्व सह्या ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात याव्या, मासिक सभा व ग्रामसभा नियमानुसार घेऊन झालेल्या ठरावाची नक्कल तात्काळ सभा संपताच देण्यात यावी, सरपंच, उपसरपंच व ग्राम विकास अधिकारी यांच्या मनमानी कारभाराला आळा बसवून कारवाई करण्यात यावी, ग्रामपंचायतला मिळणारे उत्पन्न व शासनाकडून आलेल्या निधी दर महिन्याच्या आवक जावक जमा खर्च हे नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात यावे, तसेच २९ मार्च रोजी झालेल्या मासिक सभेला गैरहजर राहणार्‍या सदस्यांच्या डुप्लिकेट सह्याचे नमुने तपासुन डुप्लिकेट सही करणार्‍यावर व ग्रामविकास अधिकार्‍यांवर ग्रामपंचायत अधिनियमानुसार कार्यवाही करण्यात यावी, ग्राम विकास अधिकारी वेळेनुसार ११ ते ६ या वेळेत ग्रामपंचायत कार्यालयात हजर राहत नसल्याने सुलतानपूर ग्रामवासीयांची होणारी गैरसोय थांबवून ग्रामविकास अधिकार्‍यांना वेळेवर हजर राहण्याचे आदेश देण्यात यावे, यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.

सध्या सुरू असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती लोणार या निवडणुकीमध्ये सुलतानपूर ग्रामपंचायत सरपंच व सर्व सदस्य यांचे मतदान यादीमध्ये नाव नसल्यामुळे मतदानापासून वंचित राहावे लागणार आहे. मतदानापासून वंचित ठेवणार्‍या जबाबदार दोषीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी ही मागणी केली आहे. दोषीवर नियमानुसार कारवाई न झाल्यास १ मे महाराष्ट्रदिनी पंचायत समिती कार्यालय लोणार समोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा वंचित आघाडीचे नेते संघपाल पनाड यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!