– भीषण पाणीटंचाईने घेतला चिमुकलीचा बळी, ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे देऊळघाटमध्ये पाणीटंचाईची झळ!
बुलढाणा (खास प्रतिनिधी) – तालुक्यातील देऊळघाट गावात भीषण पाणीटंचाई असून, येळगाव पूरक नळ योजनेकडे ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने गावात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दि. ४ एप्रिलला विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेली ८ वर्षीय बालिका तोल जाऊन ती विहिरीत पडल्याने तिचा दुर्देवी मृत्यू झाला होता. आश्वासनाने काल छेडण्यात आलेले आंदोलन मागे घेतले, मात्र आश्वासनपूर्ती न झाल्याने आज ६ एप्रिलरोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी आधिकारी यांच्या दालनासमोर ग्रामस्थांनी संतप्त होत ठिय्या आंदोलन छेडण्यात आले. बालिकेच्या मृत्यूनंतर देऊळघाटचा पाणीप्रश्न चांगलाच पेटलेला आहे.
देऊळघाट येथे पाणीटंचाई आहे. आठ वर्षीय अंजली शेजोळ विहिरीत पडून दगावल्याने काल गावकरी संतप्त झाले होते. ग्रामपंचायतच्या या हलगर्जी कारभारामुळे नागरिकांनी ५ एप्रिल रोजी देऊळघाटच्या बस स्टॅन्डवर तब्बल तीन तास रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यामुळे बुलढाणा – अजिंठा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. या आंदोलनाची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळताच तात्काळ अधिकार्यांनी आंदोलनस्थळी धाव घेऊन आंदोलनकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाने लेखी आश्वासन देऊन रात्री पूरक नळ योजना सुरू करण्याचे आश्वासन दिले होते.
परंतु आज ६ एप्रिलला दुपारपर्यंत नळ योजना पूर्ववत झाली नाही. तर ‘ग्रामपंचायत सदस्य अब्दुल रज्जाक नळ योजनेचे काम करू देणार नाही’, असे लेखी स्वरुपात ग्रामविकास अधिकारी यांनी वरिष्ठांना कळविले. सदर काम सुरु न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले. या आंदोलनाची दखल घेत तात्काळ मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते या जिल्हा परिषदेत दाखल झाल्या व त्यांनी अधिनस्त अधिकार्यांना तात्काळ नळ योजनेचे काम पोलिस संरक्षणात आज पूर्ण करण्याचे आदेश दिले. अधिकारी व कर्मचारी कामासाठी देऊळघाटकडे रवाना झाल्यानंतर नंदू लवंगे, मुशताक अहमद, सतीश भाकरे पाटील, गजनफरउल्ला खान, जुनेद खान यांनी आपले आंदोलन मागे घेतले.