बुलढाणा ( खास प्रतिनिधी) – गुटख्यावर शासनाने बंदी घातली असली तरी, छुप्या मार्गाने गुटख्याची वाहतूक होत असून, गुटखा विक्री जोमाने सुरू आहे. आज ६ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजताच्या दरम्यान मोताळा तालुक्यातील पिंपळगाव देवी फाटा येथे गुटखा वाहतूक करणारी इंडिका व्हीस्टा कारसह एकूण ३ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्तीची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. अनिल कुमार तारवानी रा. सिंधी बस्ती, कटनी कॅम्प बऱ्हानपूर,मध्यप्रदेश असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
बुलढाणा जिल्ह्यात व तालुक्यातील ग्रामीण भागात प्रतिबंधित गुटखा विक्री आणि गुटखा तस्करी छुप्या मार्गाने सुरू आहे. गुटखा वाहतुकीवर पोलीस यंत्रणाची करडी नजर असली तरी, गुटखा माफिया अनेकदा पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होताना दिसतात. आज ६ एप्रिल रोजी बऱ्हाणपूर येथील अनिल कुमार तारवानी एम.पी १२ सी.ए. १५५७ क्रमांकाच्या जुन्या इंडिका विस्टा कार मध्ये जवळपास १ लाख ७५ हजार रुपयांचा विमल, राजनिवास कंपनीचा गुटखा व पान मसाला विक्रीसाठी घेऊन जात होता.
दरम्यान बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाल्यावर पथकाने मोताळा तालुक्यातील पिंपळगाव देवी येथील पिंपळगाव देवी फाट्याजवळ सकाळी ८ वाजता सदर व्हीस्टा कार थांबवून झाडाझडती घेतली असता गुटखा मिळून आला. पोलिसांनी गुटखा व वाहनासह एकूण ३ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोहेकॉ. गजानन पाटील यांच्या तक्रारीवरून आरोपी अनिल कुमार तारवानी रा. सिंधी बस्ती, कटनी कॅम्प बऱ्हानपूर,मध्यप्रदेश याला अटक करून कलम१८८,२७३,३२८ भांदविसह कलम अन्नसुरक्षा मानके कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स्थागूशा प्रमुख अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनात सपोनि सुखदेव भोरकडे करीत आहेत.