BULDHANAVidharbha

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेला २७५ उमेदवारांची दांडी!

– बुलढाण्यात पोलिस अधीक्षकांच्या नियंत्रणात कडेकोट बंदोबस्त

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्हा पोलिस भरती प्रक्रियेत लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या ५७० उमेदवारांची आज (दि.२) शहरातील एडेड आणि ज्ञानपीठ शाळा या परीक्षा केंद्रांवर लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी तब्बल २७५ उमेदवार हे गैरहजर आढळून आले आहेत. पोलिस भरतीसाठी जीवतोड मेहनत घेणारे उमेदवार परीक्षेला गैरहजर राहिल्याने त्यांची पोलिस भरतीची संधी हुकली आहे. कडेकोट पोलिस बंदोबस्त आणि कठोर शिस्तीत ही परीक्षा घेण्यात आली.

पोलीस शिपाई पदासाठी घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत २ एप्रिलरोजी लेखी परीक्षा पार पडली. जिल्ह्यात ५१ पोलीस शिपाई पदासाठी मैदानी चाचणी पात्र ठरलेल्या ५७० उमेदवारांपैकी उर्वरीत उमेदवार सोयीच्या इतर ठिकाणी परीक्षेला गेले असावेत, असा अंदाज पोलीस विभागाने वर्तविला आहे. जिल्हा पोलिस दलाची भरती प्रक्रिया जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे. शहरातील एडेड आणि ज्ञानपीठ शाळा परीक्षा केंद्रांवर सकाळी ११ ते १२.३० वाजेदरम्यान लेखी परीक्षा घेण्यात आली. सकाळी ८ वाजेपासूनच या परीक्षा केंद्राबाहेर उमेदवारांची गर्दी झाली होती.

भरती प्रक्रियेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांनी या परीक्षा केंद्रावर बंदोबस्तासाठी १ अपर पोलिस अधीक्षक, २ उपविभागीय पोलिस अधिकारी, १६ पोलिस निरीक्षक, ४५ सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, १५० पोलिस अंमलदार व १५ महिला पोलिस अंमलदार आणि १५ व्हिडीओ कॅमेरे व दोन वाहने असा बंदोबस्त ठेवला होता. ही लेखी परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पडावी म्हणून संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले. शारीरिक चाचणीत पात्र ठरलेल्या ५७० उमेदवारांपैकी २९५ उमेदवार लेखी परीक्षेला हजर राहिले. उर्वरित २७५ उमेदवारांनी परीक्षेला दांडी मारल्याचे दिसून आले.
———————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!