जगातला शक्तिमान हिंदू नेता पंतप्रधान असताना हिंदूंना ‘आक्रोष’ का करावा लागतोय?
– छत्रपती संभाजीनगरात पार पडली महाविकास आघाडीची अतिविराट ‘वज्रमूठ’ सभा
– देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे – उद्धव ठाकरे
छत्रपती संभाजीनगर (जिल्हा प्रतिनिधी) – जगातला सर्वात शक्तिमान नेता हिंदू नेता या देशाचा पंतप्रधान झाल्यानंतरही हिंदूंना आक्रोष करावा लागतोय, त्या नेत्याची शक्ती काय कामाची, असा खोचक टोला शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपला लगावला. छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा झाली. यावेळी उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली. माझे पक्ष चोरले, धनुष्यबाण चोरला, बापही चोरायला निघाले आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी केली. तसेच, देश हुकूमशाहीकडे जात असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्या राज्यामध्ये सावरकर गौरव यात्रा निघाली आहे. तत्पूर्वी हिंदू जनआक्रोष मोर्चे निघाले होते. तुमच्याकडेही मोर्चा निघाला होता ना. मुंबईत निघाला होता. कुठून निघाला होता, माहिती नाही. मात्र तो शिवसेना भवनासमोर आला होता. जगातला सर्वात शक्तिमान नेता, हिंदू नेता या देशाचा पंतप्रधान झाल्यानंतरही हिंदूनां आक्रोष करावा लागतोय, त्या नेत्याची शक्ती काय कामाची, असा चिमटा उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला. मी काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडले असेल तर तुम्ही मेहबुबा मुफ्तींसोबत काय करत होता. आम्ही सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे तळवे चाटले तर मोदी-शहा शिंदे गटाचे काय चाटतंय? लालू-नितीश यांचे सरकार पाडून तुम्ही नितीश यांचे काय चाटलं? मेघालयातील सरकारवर आरोप केले आणि आता त्यांच्यासोबत सत्तेत बसलेत, अमित शाह तुम्ही आता संगमांचे काय चाटताय? असा खोचक सवालही ठाकरे यांनी यावेळी केला. शिवरायांचे नाव घेता आणि पाठीमागून वार करता. पदव्या दाखवून तरुणांना नोकर्या मिळत नाही आणि पीएम मोदींची पदवी मागितली म्हणून २५ हजारांचा दंड होतोय, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.
निवडून दिलं म्हणजे तुम्हाला वाटेल ते तुम्ही करू शकत नाही, जनतेला बेफाम सत्तेवर वचक ठेवावाच लागेल. सत्ताधारी सगळे काही त्यांच्या मित्रांसाठी करत आहेत. शेतकर्यांना मात्र दहा रुपयांचा चेक देऊन चेष्ठा केली जातेय. दडपशाहीविरोधात इस्त्रायलमध्ये लोक रस्त्यावर उतरलेत, राष्ट्रपतींनी पंतप्रधांना झापले, त्यानंतर त्यांना निर्णय मागे घ्यावा लागला. मला जमीन दाखवायला निघालात, तुम्ही महाराष्ट्राचे नाही आणि आम्हाला शिकवता? भाजपचा सोम्यागोम्या आमच्यावर आरोप करतो आणि आमचं कुणी काही बोललं तर खटले दाखल करता? मविआचं सरकार ज्या पद्धतीने पाडण्यात आले, ती पद्धत तुम्हाला मंजूर आहे का? महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण करण्याचे काम सत्ताधार्यांकडून सुरू आहे. सध्या देशाची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने होतेय. हा भाजप नाही भ्रष्ट जन पार्टी आहे, अशी खणखणीत टीकाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.
शिवरायांचा अवमान झाला तेव्हा मूग गिळले होते की दातखीळ बसली होती?
आम्हाला सगळ्याच महापुरुषांबद्दल आदर आहे. गौरव यात्रेला आमचा विरोध नाही पण दुपट्टी राजकारणाला आमचा विरोध आहे. तत्कालिन राज्यपालांनी छत्रपती शिवरायांचा अवमान केला तेव्हा काय मूग गिळले होते की दातखीळ बसली होती? असा घणाघाती सवाल करुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाविकास आघाडीची वज्रमूठ घट्ट असल्याचं सांगत भाजपला अस्मान दाखविण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगरवासीयांना केले. चंद्रकांत खैरे, धनंजय मुंडे, अशोक चव्हाण यांची भाषणं झाल्यानंतर अजित पवार बोलायला उभे राहिले. त्यांनी पीकविमा, अवकाळी, कांदाप्रश्न, मराठवाडा मुक्ती संग्राम, गौरव यात्रा अशा मुद्द्यांवरुन जोरदार फटकेबाजी करुन भाजपला लक्ष्य केलं.
दरम्यान, अशोक चव्हाण म्हणाले, ही विराट सभा पाहिल्यावर कितीही गौरव यात्रा काढल्या तरी काही फरक पडणार नाही. ही मन की बात नाही, ही दिल की बात आहे. देवगिरी किल्ल्यासारखी मजबूत स्थिती महाविकास आघाडीची आहे. कितीही मोठा भूकंप झाला तरी जे राहिले ते एकसंघ आहेत. गेलेत ते कावळे, राहिले ते मावळे, असा टोलाही त्यांनी शिंदे गटातील आमदारांना लगावला.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी या सभेतून भारतीय जनता पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला. सरकारला चोर म्हटलं तर आपलं सदस्यत्व कधी जाईल, कुणाला सांगता येत नाही, अशी भीती धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली. काँग्रेस नेते राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यावरून धनंजय मुंडे म्हणाले, “आता अशी परिस्थिती आहे की, सरकारच्या विरोधात कुणी काही बोललं तर पोलीस कधी घरात येतील? हे काही सांगता येत नाही. सरकारला जर चोर म्हटलं, तर कधी आपलं सदस्यत्व (आमदारकी, खासदारकी) जाईल, हे कुणालाही सांगता येत नाही. काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वानं वक्तव्य केलं कुठे, निकाल लागला कुठे, आणि सदस्यत्व रद्द कुठे झालं… आज या सरकारविरोधात जे कुणी बोलेल, त्याला दाबण्याचा प्रयत्न केला जातोय,” अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.
सावकरांबद्दल आदर असेल तर त्यांना भारतरत्न द्या – अजित पवार
तुम्ही स्वतःला सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणवता आणि मराठवाड्यातील जनतेचा अपमान करता. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा, सावित्रीबाईं फुलेंचा अपमान केला. तुम्ही त्यांना काहीही म्हटले नाही. तुमच्या नेत्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा, भाऊराव पाटलांचा अपमान केला. आम्हाला सगळ्या महापुरुषांबद्दल आदर आहे. त्यांनी काम केले म्हणून आपण आज हे दिवस पाहतोय. तुम्ही तुमच्या नेत्यांना काहीच बोलणार नाहीत. मध्यंतरी काही घटना घडल्या, सावरकरांच्या बाबतीत बोलले गेले. यानंतर वडिलकीच्या नात्याने मान्यवरांनी त्यांची समजूत घातली आणि प्रकरण शांत केले. त्यानंतरही तुमचे नेते गौरव यात्रा काढत आहेत. यात्रा काढण्यासाठी विरोध नाही, पण त्यात राजकारण आहे. सावरकरांबद्दल आम्हालाही आदर. तुमच्या मनात खरचं आदर असेल तर त्यांना भारतरत्न द्या, असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपला यावेळी लगावून भाजपवर सडकून टीका केली.
————————
https://twitter.com/i/status/1642540633167663106