बुलढाणा (विशेष प्रतिनिधी) – ग्रामपंचायत प्रशासनाने धाडच्या विविध भागात लावलेले ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे गेल्या वर्षांपासून बंद पडलेले आहेत. त्यामुळे गावाची सुरक्षा वार्यावर आहे. उपरोक्त कॅमेरे पूर्ववत सुरु करण्यात यावे, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहिते यांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली आहे. कॅमेरे सुरु न केल्यास आंदोलनाचा इशारादेखील देण्यात आला आहे.
या संदर्भात त्यांनी ग्रामविकास अधिकार्यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, धाड नगरीचा भौगोलीक विस्तार मोठ्या प्रमाणात आहे. गुन्हेगारीला लगाम लावण्यासह कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी लोकसंखेच्या तुलनेत पोलिसांची संख्या अत्यंत कमी आहे. समाजकंटकांच्या उपद्रवासह चोरी, घरफोडी तसेच अन्य गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध लावण्यासाठी तत्कालीन ग्रामपंचायत प्रशासनाने लाखो रुपये खर्ची घालून धाड नगरीच्या प्रत्येक प्रवेशव्दारासह गावातील संवेदनशील समजल्या जाणारे चौक व परिसरात जवळपास ६६ ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे लावले होते. लावण्यात आलेल्या कॅमेर्यांमुळे समाजकंटकांच्या उचापत्या कमी होवून गुन्हेगारीलाही बर्यापैकी लगाम लागला होता. सोबतच गुन्हेगार निष्पन्न करण्यासाठी उपरोक्त कॅमेरे पोलीस प्रशासनासाठी ‘तिसरा डोळा’ ठरत होते. मात्र, देखभालदुरुस्ती अभावी गेल्या काही वर्षांपासून सर्वच कॅमेरे पूर्णत: बंद पडलेले आहेत. त्यामुळे धाडच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, शासनाचे लाखो रुपये पाण्यात जाण्याच्या मार्गावर असल्याचे निवेदनात नमुद असुन सदर कॅमेरे सुरु करण्यात यावे, अशी मागणीदेखील प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहिते यांनी केली आहे. कॅमेरे पूर्ववत सुरु न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनाअंती देण्यात आला आहे.