BULDHANALONAR

बिबी येथे रामनवमी उत्साहात साजरी!

बिबी (ऋषी दंदाले) – लोणार तालुक्यातील बिबी येथे प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव अर्थात रामनवमी उत्सहात साजरी झाली. यानिमित्त हिंदू-मुस्लीम एकतेचे दर्शन घडले. रामनवमीनिमित्त काल भव्य दिव्य असे स्टेज उभारण्यात आले होते. त्यानंतर दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याची व श्रीराम यांच्या स्टेजवरील फोटोची विधिवत पूजा व आरती बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सोनकांबळे यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर दुपारून गावातून शोभायात्रा काढण्यात आली.

रामनवमीनिमित्त संकेत कुलकर्णी महाराज यांनी विधिवत मंत्र उच्चार केले. पंचक्रोशीतील सर्व नागरिक यावेळी उपस्थित होते. दुपारी ४ वाजता भव्य अशी शोभायात्रा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सुरू करण्यात आली व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोरून नंतर रामदेव बाबा मंदिर येथून मशीद समोर नेण्यात आली. या शोभायात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन यामधून घडविण्यात आले.

मुस्लिम बांधवांचा सध्या पवित्र असा रमजानचा महिना असल्यामुळे ते रोजा ठेवतात व या शोभा यात्रेतील मंडळींनी त्यांना फळवाटप करून त्यांचे सहर्ष स्वागत केले व मुस्लिम बांधवांनी सुद्धा शोभायात्रेतील सर्व मंडळींना सरबतचे वाटप करण्यात आले. त्यानंतर ग्रामपंचायतमार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे या शोभायात्रेची सांगता करण्यात आली. शोभा यात्रेदरम्यान बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सर्व टीमने कडक बंदोबस्त ठेवला व श्रीराम प्रतिष्ठान यांनीसुद्धा अथक परिश्रम घेतले. अशाप्रकारे बिबी येथे रामनवमी उत्सवानिमित्त हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन घडले व रामनवमी उत्साहात साजरी झाली.
————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!