BULDHANAHead linesVidharbha

कर्तव्यपूर्ती करताय मग आरोग्य जपा! २८०० पोलिसांच्या आरोग्य तपासणीसाठी ‘एसपीं’चा पुढाकार!

बुलढाणा (प्रशांत खंडारे) – अनियमित दिनक्रम हे पोलिसांचे वैशिष्ट्य आहे. कर्तव्यपूर्ती करताना आरोग्याकडे दुर्लक्ष होते. पोलिसांचा वाढता ताणतणाव कमी व्हावा व सध्या कोरोना नसला तरी त्याचे साईडइफेक्ट पाहाता, या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांनी २८०० पोलीस कर्मचारी- अधिकार्‍यांच्या आरोग्य तपासणीसाठी पुढाकार घेतला आहे. काल १५० आणि आज ४०० पोलिसांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आतापर्यंत जवळपास एक हजार पोलिसांची तपासणी झाली आहे.

पोलिसांना अनेकदा खूप वेळ उभे राहणे सहन करावे लागते. कुठे बंदोबस्तासाठी जाणे, कुठल्या मोर्चाबरोबर तासन्तास चालणे, कैद्यांना कोर्टात हजर करण्यासाठी नेणे, वाहतुकीची व्यवस्था लावण्यासाठी उभे राहावे लागणे, अशी किती तरी कामे पोलिसांना करावी लागतात. परिणामी काम करताना आरोग्याकडे दुर्लक्ष होते. विशेष म्हणजे, बुलढाणा जिल्ह्यातील एका ३५ वर्षीय पोलिसाचा हृदयरोगाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे आरोग्य तपासणीचा विषय गांभीर्याने घेण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास २८०० पोलीस कर्मचारी, अधिकारी आरोग्य तपासणी करून घेणार आहेत. खामगाव आणि मलकापूर येथील पोलिसांची तपासणी तत्पूर्वी झाली असून, आतापर्यंत १ हजार पोलिसांची आरोग्य तपासणी झाली आहे. ब्लड टेस्ट, इसीजी, शुगर लेवल व इतर तपासण्या केल्या जात आहे. काही आजार आढळले तर येथील लद्दड हॉस्पिटल, मेहत्रे हॉस्पिटल, संचेती हॉस्पिटल यांच्या सहकार्याने हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार करण्यात येणार आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्रला’ सांगितले.
——————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!