Head linesKARAJATPachhim Maharashtra

कर्जत पंचायत समितीत निर्माण झाला कागदपत्रे व्यवस्थापनाचा ‘गोपाळघरे पॅटर्न’!

– शिक्षण विभागातील सोमिनाथ गोपाळघरे यांच्या कामाची वरिष्ठांनी दखल घेण्याची गरज!

कर्जत (आशीष बोरा) – कार्यालयातील विषयनिहाय कागदपत्रे सांभाळणे व अनेक कागदांमधून नेमका गरजेचा कागद शोधणे म्हणजे मोठे जिकरीचे काम. मात्र आपला वेळ व त्रास वाचविण्यासाठी आपल्यालाच काम करावे लागते, थोडा डोक्याला ताण दिला की मार्ग सुचू शकतो कर्जत येथील शिक्षण विभागातील सर्व शिक्षा अभियानातील सोमिनाथ गोपाळघरे यांनी उपलब्ध होऊ शकणार्‍या प्लास्टिक रँकचा खुबीने वापर करून त्यात विषयनिहाय कागदपत्रे ठेवण्याची व्यवस्था केली व त्याचे काम इतके हलके झाले की, अधिकार्‍याचा फोन आला की अवघ्या काही मिनिटात माहिती उपलब्ध होऊ लागली व मोठा त्रास कमी झाला.

कर्जत पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील सर्व शिक्षा अभियानात डाटा एन्ट्री ऑपरेटर व सहाय्यक म्हणून पदावर काम करणारे सोमिनाथ गोपाळघरे यांच्याकडे विविध विषयांचे विविध शाळांचे अहवाल केंद्रप्रमुख यांच्यामार्फत जमा होतात, सातत्याने विविध कागदपत्र येत असल्याने त्याचे एकत्रिकरण करणे, त्यांना अपडेट ठेवणे, व योग्य वेळी त्यातून नेमका कागद पुन्हा उपलब्ध करून देणे हे अत्यंत जिकरीचे काम होते. त्यामुळे कागद शोधण्यात बराच वेळ जात होता, यातून वेळेत माहिती अधिकारी वर्गापर्यंत न गेल्यास चिडचिड होणे, अधिकार्‍यांच्या रोषास सामोरे जाणे याला तोंड द्यावे लागत होते, विविध चार्ज आल्याने व वर्क लोड वाढल्याने यावर कसा मार्ग काढावा असा प्रश्न पडलेला असताना वेगवेगळ्या विषयासाठी बॉक्स करण्याची कल्पना सुचली व त्याच दरम्यान घरात कप्प्याचे बॉक्स असतात तेच डोळ्यासमोर आले. यावर प्लास्टिकच्या दुकानात जाऊन पाहिले असता त्यात थोड्या मोठ्या आकाराचे पाच कप्प्याचे रँक पसंत पडले. त्यांनी स्व खर्चाने दोन रँक आणले व त्याचा अनुभव घेतला. याचा चांगला फायदा होतो आहे हे लक्षात आल्यानंतर टप्याटप्प्याने यात वाढ केली. आज त्यांच्या खोलीत असे तीस कप्पे असलेले सहा रँक असून या प्रत्येक कप्प्याच्या बाहेर चिठ्ठी चिटकवून त्या कप्प्यात कोणती कागद पत्रे आहेत हे निर्देशित केले आहे.

या तीस कप्प्यामध्ये शालेय पोषण आहार प्रपत्र, अनुदान आदेश तांदूळ व धान्य आदी वाटप, शापोआ पत्रव्यवहार, शापोआ मागणी, शापोआ पुरवठादार, शापोआ स्वयंपाकी मानधन, शापोआ ऑडिट, अशी एक स्वतंत्र लाईन बनवली आहे तर दुसर्‍या लाईनमध्ये सर्व शिक्षा अभियानचे गणवेश, सशि बांधकाम, सशि पाठ्यपुस्तक, सशि माहिती अधिकार, स्कॉलरशीप व इतर परीक्षा, जनरल पत्रव्यवहार, सरल प्रणाली व युडायस, आरटीई २५ टक्के, लेखा पत्रव्यवहार, समग्र शिक्षा ऑडिट, असे विषय दुसर्‍या लाईनमध्ये आहेत. याशिवाय इतर वेगवेगळ्या रंगाचे कप्पे आणून त्या जि.प. कडे द्यायचे अहवाल, स शि तालुकास्तर पेंडींग कामकाज, स शि केंद्र प्रमुख पेंडींग अहवाल, शा पो आ.केंद्र प्रमुख पेंडींग अहवाल, शा पो आ तालुकास्तर पेंडींग कामकाज, असे स्वतंत्र कागद पत्रे ठेवल्याने, काम कोणते पेंडीग आहे अहवाल कोणते पाठवायचे आहेत हे तातडीने तेवढा कप्पा पहिला तरी लगेच लक्षात येते, यामुळे कामात अत्यंत सुसूत्रता आली असून, शोधाशोधित जाणारा वेळ वाचला आहे, होणारा मानसिक त्रास वाचला आहे.

कर्जत पंचायत समितीच्या जुन्या जागेत जेथे शिक्षण विभाग होता तेथे काही खोल्यामधून शिक्षण विभागाचे काम चालते. तर प्रमुख अधिकारी व विस्तार अधिकारी मात्र भांडेवाडीतील मुख्य पंचायत समितीच्या कार्यालयात शिक्षण विभागात बसतात. त्यामुळे जूण्या इमारतीत तशी वर्दळ कमीच असली तरी अवांतर लोकांचा खूप त्रास होता. कार्यालय सुटल्यानंतर अनेक नशा करणारे लोक दारात घाण करत यावर उपाय म्हणून गोपाळ घरे यांनी बाहेरच्या बाजूला लोखंडी कंपाऊंड केले, यामुळे कार्यालय सुरक्षित झाले. आतमध्ये फुलझाडे लावली. त्याला स्वत: पाणी घालून ही जगवली. हा परिसर सद्या अत्यंत नयनरम्य वाटत असून सर्वत्र अत्यंत स्वच्छता पहावयास मिळत आहे. कार्यालयातील गोपाळघरेच्या केबिनला जातात प्रसन्न वाटते समोरच वेगळे पणा असलेले प्रत्येक कप्याला नाव देऊन उभे केलेले रँक सर्वाचे लक्ष वेधून घेतात, त्याच्या कामाप्रमाणे प्रत्येक कार्यालयातही कार्य पद्धती अवलंबली गेल्यास नक्कीच शासकीय कार्यालयातील कर्मचारी वर्गाची नाहक त्रासातून सुटका होईल. यासाठी प्रशासनाने अशा उपक्रमांना शोधून त्याचा गौरव करायला हवा व त्याचा अभ्यास करून त्याची अंमलबजावणी करायला हवी.


फक्त कागद पत्राचे व्यवस्थापन करण्याचे काम गोपाळघरे यांनी केले असे नाही, तर साधे कार्यालयात शिक्के असो, वेगवेगळे पेन, स्टेपलर, टॅग असो, यासाठी ही छोट्या कप्प्याचे ट्रे टेबलवर ठेवले असून, विविध कुलुपाच्या चाव्या असतील, वा पेन ड्राईव्ह असतील, त्याला ही स्वतंत्र व्यवस्था करून उपलब्ध मिळू शकणार्‍या साधन सामुग्रीचा अत्यंत खुबीने वापर करून त्यांनी आपले काम सोपे व सुटसुटीत केले आहे. गोपाळघरे यांच्या टापटीप व जलद कामामुळे अनेक शिक्षक ही त्याचे विशेष कौतुक करतात.
——————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!