BULDHANAHead linesVidharbha

पीकविमा नुकसान भरपाईची रक्कम मिळण्यास सुरूवात

– नुकसान भरपाईची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होण्यास सुरूवात
– जिल्ह्यातील १ लाख ६२ हजार शेतकर्‍यांना मिळणार १७४ कोटींचा लाभ

बुलढाणा (खास प्रतिनिधी) – पीकविमा आणि अतिवृष्टीची नुकसान भरपाई यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सातत्याने लक्ष्यवेधी आणि जीवघेणी आंदोलने केली आहेत. त्यांच्या या आंदोलनाचे फलीतदेखील दरवेळी दिसून येत आहे. शेतकर्‍यांना पीकविम्याची रक्कम मिळवून दिल्यानंतर आता नुकसान भरपाईची रक्कमदेखील शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. रविकांत तुपकरांच्या आंदोलनाचे हे आणखी एक मोठे यश आहे.

सोयाबीन -कापसाला दरवाढ, पीकविमा आणि अतिवृष्टीची नुकसान भरपाई यासह इतर मागण्यांसाठी रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात ६ नोव्हेंबरला विराट एल्गार मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर २४ नोव्हेंबर रोजी शेतकर्‍यांची फौज घेऊन जलसमाधी आंदोलनासाठी मुंबईत धडक दिली. या आंदोलनाची दखल घेत राज्य शासनाने अतिवृष्टीची नुकसान भरपाई म्हणून बुलढाणा जिल्ह्यासाठी १२४.२४ कोटी व वाशीम जिल्ह्यासाठी ३२.७७ कोटी असे एकूण १५७ कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. आधीचे मंजूर असे बुलढाणा जिल्ह्यासाठी एकूण १७४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले, तर याच आंदोलनावेळी पीकविमा कंपनीने तातडीने १०४ कोटी रुपयांची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात जमा केली होती. यासह राज्य शासनाने बहुतांश मागण्या मान्य केल्या, ही या आंदोलनाची मोठी फलश्रृती होती. त्यानंतरही तुपकरांचा इतर मागण्यांसाठी गल्ली ते दिल्लीपर्यंतचा पाठपुरावा सुरुच होता.

दरम्यान, शासनाने मंजूर केलेले १७४ कोटी रुपये ऑनलाईनच्या खोड्यामुळे अद्यापही शेतकर्‍यांना मिळाले नसल्याने तुपकरांनी ११ फेब्रुवारीरोजी आत्मदहन आंदोलन केले. या आंदोलनाचा धसका घेत आंदोलनाच्या एक दिवस आधी १० फेब्रुवारी रोजी पीकविम्याचे ९ कोटी ७८ लाख शेतकर्‍यांचा खात्यात जमा करण्यात आले, तर आंदोलनानंतर ४२ कोटी ५९ लाख रुपये शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्यात आले. अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईच्या रखडून पडलेल्या ऑनलाईन याद्या तयार करण्यात आल्या होत्या. परंतु त्यानंतरही १७४ कोटी रुपयांचे वितरण न झाल्याने तुपकरांनी पुन्हा पत्र देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. आता सदर नुकसान भरपाईची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील एकूण १ लाख ६२ हजार ७३ शेतकरी यासाठी पात्र आहेत. यातील ९० हजार शेतकर्‍यांच्या याद्या अपलोड झाल्या असून, २९ मार्चपर्यंत जवळपास ३८ हजार शेतकर्‍यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली आहे. उर्वरित शेतकर्‍यांच्या खात्यात लवकरच ही रक्कम जमा होणार आहे. रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाची हे आणखी एक मोठे यश ठरले असून शेतकर्‍यांना दिलासा मिळाला.

तुरुंगात जाण्याचे फळ

शेतकर्‍यांच्या न्यायहक्कासाठी रविकांत तुपकर गेल्या २० वर्षांपासून लढा देत आहे. त्यांच्या प्रत्येक आंदोलनाने शेतकर्‍यांच्या पदरात काही ना काही पाडून दिले आहे. त्यामुळे त्यांचे आजवरचे आंदोलने खर्‍याअर्थाने यशस्वी ठरली आहेत. ११ फेब्रुवारी रोजी झालेल्या आत्मदहन आंदोलनात त्यांना पोलिसांचा लाठीमार सोसावा लागला, गंभीर स्वरुपाचे गुन्हे त्यांच्यावर दाखल झाले, तरुगांत जावे लागले ही खंत एका बाजूला असली तरी याच आंदोलनामुळे १ लाख ६२ हजार ७३ शेतकर्‍यांच्या खात्यात १७४ कोटी रुपयांची रक्कम जमा होत असल्याने तुरुंगात जाण्याचे सकारात्मक फळ मिळाले, हे विशेष.


काँग्रेसनेही केले होते घेराव आंदोलन

दरम्यान, सोयाबीनला भाव व पीकविम्याची रक्कम मिळण्यासाठी जिल्हा काँग्रेसनेदेखील चिखलीत जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात कृषी कार्यालयाला घेराव आंदोलन केले होते. तसेच, चिखलीत बैलगाडी, ट्रॅक्टर मोर्चा काढून राज्य सरकारला इशारा दिला होता. त्यामुळे मिळालेल्या पीकविम्याचे श्रेय काही काँग्रेस नेतृत्वदेखील घेताना दिसत आहे.
——————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!