बुलढाणा (खास प्रतिनिधी) – प्रत्येक जण संसाराचा डोलारा पेलण्यासाठी कष्ट उपसत असतो. शेतकरी तर रक्ताचं पाणी करतात. मात्र नियतीचा खेळ कुणालाच कळत नाही. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे एका शेतकरी महिलेच्या गळ्यातील स्कार्फ कष्ट उपसणार्या महिलेसाठी फाशी ठरली. गळ्याला गुंडाळलेला स्कार्फ गहू स्वच्छ करण्याच्या फिल्टर मशीनमध्ये अडकल्याने तिचा दुर्देवी मृत्यू झाला. शांताबाई शेवाळे असे मृत महिलेचे नाव आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील शेतकरी तुळशीराम शेवाळे यांच्या ३५ वर्षीय पत्नी शांताबाई, आणि त्यांचा मुलगा स्वतःच्या शेतामध्ये गहू स्वच्छ करण्याच्या फिल्टर मशीनवर काम करत होते. गहू स्वच्छ करीत असताना शांताबाई शेवाळे यांच्या गळ्याला गुंडाळलेला स्कार्फ अचानक मशीनमध्ये अडकला. यावेळी फिल्टर मशीनमध्ये अडकलेल्या स्कार्फने गळ्याला फास बसल्याने शेतकरी महिलेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे सिंदखेडराजा शहरावर शोककळा पसरली आहे. शांताबाई शेवाळे यांच्या पश्चात पती व दोन मुले असा परिवार आहे.