बुलढाणा (खास प्रतिनिधी) – सध्या तरुणाईची संवेदनशीलता कमी होत चालली आहे. त्यामुळे थोड्याशा अपयशानेही तरुण खचून जातात आणि वाईट पर्यायांचा अवलंब करतात. २८ मार्चला बुलढाणा तालुक्यातील टाकरखेड हेलगा येथील एका २२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले. राम प्रभाकर गुंजकर असे या मृत तरुणाचे नाव आहे. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही. परंतु जीवन म्हणजे खेळ नाही तर देवाने दिलेली एक सुंदरशी भेट आहे. त्यामुळे जीवनाचा कसा अर्थ घ्यायचा आणि तो सार्थकी कसा लावायचा? एवढे साधे गणित नवपिढीला का कळत नाही? हा मोठा प्रश्न आहे.
प्रत्येकाच्या जीवनात येणारे बिकट प्रसंग आणि अपयश नव्याने उभं राहण्याची उमेद देऊन जातात. मात्र आजची तरुणाई बिकट प्रसंगात खचून जाते आणि आयुष्यासमोर कायमची हार मानून बसते. काहींना तर अपयश पचवण्याची ताकद सुद्धा नसते आणि मग मनात सुरू होतात वाईट विचारांचे चक्रीवादळ.अपयशाचे सावट अवतीभवती फिरू लागले की आयुष्यात आता दुसरं काही आम्ही करू शकत नाही आणि मग देवाने दिलेल्या सुंदर अशा आयुष्याला पूर्णविराम द्यायचा, हा विचार आजच्या तरुण मंडळीत ठाण मांडून बसला आहे. बुलढाणा तालुक्यातील टाकरखेड हेलगा गावातील राम प्रभाकर गुंजकर या तरुणाने देखील टोकाचा निर्णय घेऊन काकांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेतला. याबाबत नातेवाईकांनी अमडापूर पोलीस स्टेशनला माहिती दिल्यावरून यंत्रणेने पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. सूमीरसिंह ठाकुर पुढील तपास करीत आहे. असे असले तरी, स्पर्धेच्या युगात प्रत्येक चढउताराला सामोरे जायचं असेल तर आपल्यात ताकद असावी लागते. जीवनातील कटूसत्य तरुणाईने स्वीकारले पाहिजे. परीक्षेत कमी गुण मिळणे प्रेमभंग, एकतर्फी प्रेम, घरच्यांसोबत भांडण, घरातील अंतर्गत वाद अशा अनेक कारणांनी तरुणांचे खच्चीकरण होत असते. मात्र या गोष्टींना समोर जाण्याची तयारी असलीच पाहिजे, असे मत जाणकार व्यक्त करीत आहेत.