Breaking newsHead linesPuneWorld update

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन

–  वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार!

पुणे (सोनिया जोशी) – पुण्याचे खासदार, भाजप नेते तथा राजकारणातील अजातशत्रु व्यक्तिमत्व गिरीश बापट यांचे आज दुपारी दुर्धर आजाराने पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले आहे. सकाळपासून त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती. त्यामुळे त्यांना जीवरक्षा प्रणालीवर (लाईफ सपोर्ट सिस्टिम) ठेवण्यात आले होते. परंतु, मृत्यूशी झुंज ते हरले, आणि पुण्यावर शोककळा पसरली. मृत्युसमयी ते ७३ वर्षांचे होते. भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी बापटांच्या मृत्यूसंदर्भात माहिती दिली. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी ६ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.  त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध होते. राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे हे तर बापटांच्या निधनानंतर अनावर भावनांनी ओक्साबोक्सी रडले. राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण आदी सर्वपक्षीय नेत्यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप, आमदार मुक्ता टिळक यांच्यानंतर आता खा. बापट यांच्या अकाली निधनाने भाजपला पुण्यात मोठा धक्का बसला आहे.

दिवंगत खासदार गिरीश बापट यांचे पार्थिव दुपारी दोन वाजेपासून ते ६ वाजेपर्यंत शनिवार पेठेतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले हाेते.  पुणेकरांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. खा. बापट यांची प्रकृती खालावल्याची माहिती आज सकाळी समोर आली होती. बापट यांच्यावर पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. ही बातमी शहरात कळताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती. तर बापट यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्यासह भाजप व सर्वपक्षीय प्रमुख नेते पुण्यात पोहोचले होते. खासदार बापट यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

पुणे शहराच्या राजकारणामध्ये गेली ४० वर्षे सक्रिय असलेले गिरीश बापट माझे जवळचे मित्र होते. गेली ३०-३५ वर्षे आम्ही राजकारणात एकत्र काम करत होतो. काही महिने ते फुफ्फुसाच्या विकाराने आजारी होते. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. महापालिका, विधानसभा आणि लोकसभेत त्यांनी केलेले काम अत्यंत उल्लेखनीय आहे. पुणेकरांच्या सुखदुःखात सातत्याने सहभागी होणारा जवळचा सहकारी गेल्याचे मला अतीव दुःख आहे, पुणे शहरातील ही पोकळी कधीही भरुन निघणार नाही, असे सांगतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा प्रवक्ते अंकुश काकडे यांना हुंदका अनावर झाला.

गिरीश बापट यांचा जन्म ३ सप्टेंबर १९५० रोजी पुण्यात झाला. तळेगाव दाभाडेमधून प्राथमिक शिक्षण झाल्यावर त्यांचे माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल रमणबागेत झाले. बीएमसीसीत वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यावर बापट १९७३ मध्ये टेल्कोमध्ये कामगार म्हणून रुजू झाले. त्यानंतर दोन वर्षांतच आणीबाणीमध्ये १९ महिन्यांचा कारावास नाशिक जेलमध्ये त्यांनी भोगला. पुण्याच्या राजकारणात ‘भाऊ’ म्हणून ओळखले जाणारे बापट हे मूळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. जनसंघापासून ते राजकारणात उतरले. नगरसेवक पदापासून सुरुवात केलेले गिरीश बापट १९९५ पासून सलग पाचवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रसेच्या मोहन जोशी यांना पराभव करत, त्यांनी लोकसभा गाठली होती.

गिरीश बापट हे आजारी असताना भाजपच्याच नाहीतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही त्यांची भेट घेतली होती. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतच इतर नेत्यांनीही भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यांच्या जाण्याने भाजपसह राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.


गिरीश बापट यांचा राजकीय प्रवास

– गिरीश बापट यांनी नगरसेवक म्हणून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली.
– नगरसेवक ते खासदार असा जवळपास चाळीस वर्षांचा त्यांचा प्रवास होता.
– १९८३ पासून राजकारणात सक्रीय असलेले गिरीश बापट तीनवेळा नगरसेवक, पाचवेळा आमदार राहिले आहेत.
– २०१४ साली देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती.
– २०१९ च्या निवडणुकीत बापट खासदार म्हणून निवडून आले.
– नुकत्याच झालेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत गिरीश बापट यांनी आजारपण बाजूला सारून कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला हजेरी लावली होती.
– या मेळाव्याला येतानाही गिरीश बापट यांच्या नाकात नळी आणि सोब्ात ऑक्सिजन सिलिंडर होता. या परिस्थितीमध्येही गिरीश बापट यांनी भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले होते.
——————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!