बुलढाणा नगरपालिका करते तरी काय?
बुलढाणा (प्रशांत खंडारे) – महागड्या शहरांत हक्काचे घर घेणे सार्वसामान्यांसाठी अवघड ठरत आहे. मात्र अशा वेळी सर्वसामान्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न परवडणाऱ्या दरात ‘म्हाडा’ पूर्ण करते. त्यामुळेच ‘म्हाडा’च्या घरांवर उड्या पडतात. ‘म्हाडा’च्या सोडतीत सहभागी होण्यासाठी अनेक अटी आहेत. परंतु बुलढाणा येथे नगरपालिकेचे चित्र वेगळे आहे. पैशांचा उंबरठा ओलांडला की, घर नव्हे केवळ तात्पुरता दिलासा मिळतो, अशी ओरड आहे. १९५ घरे असताना केवळ ४० ते ५० अर्जदारांचे या योजनेसाठी अर्ज आहेत. विशेष म्हणजे, कंत्राटदराने निकृष्ट दर्जाचे काम केले असून, घरांच्या भिंतींना भेगा पडल्या आहेत.
‘सरकारी काम बारा महिने थांब’ या उक्तीप्रमाणे सरकारी कामकाज चालते, परंतु यात गरीब- सर्वसामान्य लोकांची होरपळ होते. हक्काचे घर हे गरीब आणि सर्वसामान्यांचे स्वप्न असते. शासनाने म्हाडा ही योजना कार्यान्वित केली. त्यामुळे गरजूंना दिलासा मिळाला. अनेकांनी अटींसह डीडी सहित अर्ज केले. दररोज नगरपालिकेचा अर्जदार उंबरठा झिजवतात. अकोला येथील म्हाडा कार्यालयात देखील चकरा घालतात. मात्र त्यांना समाधानकारक उत्तर कुठूनच मिळत नाही. चेंडू टोलवण्याचे काम सुरू आहे. तुम्ही बेघर आहात का हा एकच प्रश्न नगरपालिकेचे अधिकारी विचारतात. बुलढाण्यात १९५ घर बांधण्यात आले आहेत. परंतु केवळ ४० ते ५० अर्ज नगरपालिकेच्या फाईल मध्ये दिसते. बांधलेल्या घरांचा निकृष्ट पणा फेरफटका मारल्यावर दिसून आला. सर्व कामे बोगस झाल्याची उघडपणे दिसून येते, असा आरोप आता अर्जदार करीत आहेत. नगरपालिकेचा उंबरठा पैशाशिवाय ओलांडू शकत नाही, अशी अर्जदारांची धारणा झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.