आमदार श्वेताताई महाले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जेवणातील उरलेल्या पदार्थाचे ढीग तसेच पडून!
– विद्यार्थी, दुकानदार व नागरिकांना दुर्गंधीचा होणार त्रास; तातडीने विल्हेवाट लावणे गरजेचे!
चिखली (संजय निकाळजे/ महेंद्र हिवाळे) – एकीकडे महागाईने उच्चांक गाठला म्हणून महाविकास आघाडीच्यावतीने मोर्चे, आंदोलने सुरू आहेत. तर दुसरीकडे चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भोजनाच्या कार्यक्रमातील शेकडो लोकं जेवतील एवढे अन्न वाया गेले आहे, व त्याचे ढीग तसेच पडून आहेत. त्याची प्रचिती मंगळवार, दि. २८ मार्च रोजी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने सायंकाळी चार ते पाच वाजेदरम्यान आपल्या कॅमेरात कैद केली. या कॅमेरात क्रीडा संकुलात पडलेले पोळी, भात भाजी त्यांचे ढीग कॅमेर्यात कैद करण्यात आले.
चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले यांचा सोमवार, २७ मार्च रोजी वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त मतदार संघामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केले होते. तर चिखली येथील क्रीडा संकुल मैदानावर ‘डे नाईट’ क्रिकेट मॅचचेदेखील आयोजन केलेले होते. या क्रिकेट सामन्यांना प्रतिसादही मिळाला. सोमवार, २७ मार्च रोजी चिखली विधानसभा मतदारसंघातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर यांचा वाढदिवसानिमित्त अपघात विमा काढण्यात आला. त्यामुळे त्या धनादेश वितरणाचा कार्यक्रम आणि मतदारसंघातील कार्यकर्त्यांना जेवणाचा कार्यक्रम क्रीडा संकुल मैदानावर आयोजित केला होता. असंख्य कार्यकर्ते जेवलेत, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर यांनीसुद्धा जेवणाचा आस्वाद घेतला. एकीकडे आमदार श्वेताताईंचा सत्कार सोहळा सुरू असताना बाजूलाच समोर जेवणाची व्यवस्था केलेली होती. मात्र याच बनवलेल्या अन्नपदार्थातील काही पदार्थ उरल्यामुळे त्याची नीट विल्हेवाट न लावता दुसर्या दिवशी म्हणजे मंगळवार, २८ मार्चच्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत पोळी, भात, भाजी यांचे ढीग क्रीडा संकुल मैदानाच्या आवारामध्ये पडून होते. तर मैदानावर प्लास्टिक ग्लास विखुरलेले होते.
त्यावर ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या कॅमेर्याची नजर पडली व ते सर्व पदार्थ कैद केले. एकीकडे सामान्य गोरगरीब जनता महागाईने त्रस्त असताना आणि त्यातल्या त्यात सरकारने स्वस्त धान्य दुकानातील धान्य बंद केले आहे. त्यामुळे महागाचे धान्य विकत घेऊन त्यावर गुजराण करावी लागते. याच महागाईच्या विरोधात महाविकास आघाडीच्यावतीने चिखली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात कृषी अधीक्षक कार्यालयाला घेराव आंदोलन सुरू असताना, दुसरीकडे आमदार शेताताई महाले यांचा वाढदिवस सोहळा सुरू होता. असो…! क्रीडा संकुल मैदानावर पडलेल्या अन्नपदार्थाच्या ढिगार्यामुळे व इतर पदार्थामुळे शेजारीच असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे समोरील रोडवर असलेल्या दुकानदार व गिर्हाईक आणि क्रीडा संकुल मैदानावर फिरण्यासाठी किंवा व्यायामासाठी येणार्यांना त्याच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे त्याची विल्हेवाट लावणेही महत्त्वाचे ठरत आहे. हेही तितकेच खरे..!