बुलढाणा (बाळू वानखेडे) – जिल्ह्यातील दहा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवड़णुकीसाठी २७ मार्चपासून अर्ज भरणे सुरू असून, दोन दिवसांत १० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये लोणार बाजार समितीसाठी सर्वाधिक सहा अर्ज दाखल झाले आहेत.
जिल्ह्यातील खामगाव, बुलढाणा, चिखली, मेहकर, लोणार, जळगाव जामोद, मलकापूर, नांदुरा, शेगाव व देऊळगाव राजा अशा दहा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवड़णुका जाहीर झाल्या असून, २७ मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांत म्हणजे ७ मार्च व आज २८ मार्च रोजी मिळालेल्या माहितीनुसार, दहा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये देउळगावराजा बाजार समितीसाठी सर्वसाधारण मधून गजानन ड़ोईफोड़े यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. लोणारमध्ये अड़ते व्यापारी मधून मुक्ताजी लक्ष्मण सोनुने, ग्रामपंचायत सर्वसाधारण व सेवा सह. संस्था महिला राखीव मधून तारामती बद्रीनाथ जायभाये, शेतकरी ग्रामपंचायत सर्वसाधारण मधून मोतीराम सदाशिव ड़व्हळे, शेतकरी सेवा सह. सर्वसाधारण मधून विनायक गोपाळराव मापारी, हमाल व व्यापारी मधून शे.ईरफान शे.रहीम तर मेहकर बाजार समितीसाठी सर्वसाधारण मधून दोन तर अड़ते व्यापारी मधून एक उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती आहे. बुलढाणा, मलकापूर तसेच सर्वात मोठी खामगाव बाजार समितीसाठी अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. शेतकरी सर्वसाधारण उमेदवारासाठी अनामत रक्कम पाच हजार तर राखीव जागेसाठी एक हजार रूपये ठेवण्यात आली आहे.
उमेदवारी अर्जासोबत सहा ते सात पानांची माहिती पुस्तिका जोड़ली आहे ती वाचल्यास उमेदवार स्वतःच आपला अर्ज सहज भरू शकतील, असे मेहकर निवड़णूक विभागाचे एम. पी. धुळे यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले. सुट्या वगळता ३ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. निवड़णकीची तारीख जसजशी जवळ येईल तसा या निवडणुकीला रंग येणार आहे.
——————